दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:03 IST2026-04-07T07:01:54+5:302026-04-07T07:03:13+5:30
बॉम्बस्फोटाच्या धमक्या, आता घुसखोरी

दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत एका मास्कधारी व्यक्तीने सोमवारी दुपारी भरधाव एसयूव्ही थेट विधानसभा संकुलात घुसवली. दुपारी २ च्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घुसखोराने विधानसभेच्या गेट क्रमांक दोन समोरील बॅरिकेड्स अक्षरशः उडवले आणि गाडी थेट आत नेली.
विधानसभेचे अधिवेशन सुरू नसल्याचा फायदा घेत या व्यक्तीने सुरक्षा व्यवस्था भेदली. आत घुसल्यानंतर त्या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर एक पुष्पगुच्छ ठेवला आणि तिथून तातडीने पळ काढला. संशयास्पद पुष्पगुच्छ आढळताच बॉम्बशोधक पथक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची तपासणी केली, मात्र संशयास्पद साहित्य आढळले नाही.
बॉम्बस्फोटाच्या धमक्या, आता घुसखोरी
पोलिसांनी सांगितले की, दिल्ली विधानसभा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या भागात घुसखोरी करणारे लोक व त्यातील व्यक्ती यांच्या शोधासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली. शेजारच्या राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करून विधानसभा परिसरात घुसखोरी करणारे वाहन व चालकासह तीन जणांना दिल्लीच्या उत्तर भागातून ताब्यात घेतले आहे. दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता या वास्तूच्या परिसरात वाहनाने घुसखोरी केल्याने सुरक्षा व्यवस्थेचे बिंग फुटले आहे.