काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 08:11 IST2025-04-21T08:10:37+5:302025-04-21T08:11:10+5:30

ढगफुटीमुळे रामबन जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. १०० हून अधिक लोकांना वाचविण्यात आले आहे

Three people died due to cloudburst in Jammu and Kashmir's Ramban district on Sunday | काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

सुरेश एस डुग्गर

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात रविवारी ढगफुटीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. जम्मू-श्रीनगर महामार्ग पाच ठिकाणी वाहून गेला आहे.

रामबनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कुलबीर सिंह यांनी सांगितले की, रामबनच्या सेरी बागना गावात ढगफुटीत घर कोसळल्याने दोन मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून, त्यांची नावे आकिब अहमद आणि मोहम्मद साकिब अशी आहेत. दोघेही भाऊ होते. या तिघांच्या मृत्यूसह गेल्या दोन दिवसांत जम्मू प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या पाच झाली आहे. 

एसएसपी म्हणाले की, जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे रामबन जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. १०० हून अधिक लोकांना वाचविण्यात आले आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. धर्मकुंड गावात आलेल्या पुरामुळे सुमारे ४० घरांचे नुकसान झाले आहे. एका जलाशयाच्या पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत असल्याने अनेक वाहने वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे.

प्रवासी अडकले

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नाशरी आणि बनिहालदरम्यान सुमारे बारा ठिकाणी सततच्या पावसामुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे, असे एसएसपी ट्रॅफिक नॅशनल हायवे (रामबन), राजा आदिल हमीद गनई यांनी सांगितले. ते म्हणाले की, महामार्गावर पाऊस सुरूच आहे आणि हवामान सुधारेपर्यंत आणि रस्ता मोकळा होईपर्यंत लोकांना मुख्य रस्त्यावरून प्रवास करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. महामार्ग बंद पडल्यामुळे शेकडो प्रवासी अडकले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक

दरम्यान, ट्विटरवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, ते उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी यांच्या संपर्कात आहेत. जिल्हा प्रशासनाने वेळेवर आणि त्वरित कारवाई केल्याबद्दल आणि अनेकांचे जीव वाचवल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. सिंह म्हणाले की, आर्थिक आणि इतर सर्व प्रकारच्या मदती दिल्या जात आहेत. गरज पडल्यास खासदारांच्या वैयक्तिक स्रोतांमधूनही पुढील मदत देण्यात येईल.

हवामान खात्याचा इशारा

आयएमडीच्या श्रीनगर शाखेने म्हटले आहे की, रविवार दुपारपासून संध्याकाळपर्यंत वातावरण ढगाळ राहील आणि बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तसेच गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल.

Web Title: Three people died due to cloudburst in Jammu and Kashmir's Ramban district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.