उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथे तीन सरकारी बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी १५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महाराजगंज जिल्ह्यातील भिटौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराजगंज-गोरखपूर नॅशनल हायवे-७३० वर झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तिथे या जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बसपैकी एक बस महाराजगंज येथून गोरखपूरला जात होती. त्याचवेळी समोरून आलेली दुसरी बस या बसवर धडकली. तर मागून येत असलेली तिसरी बसही या बसवर येऊन धडकली.
दोन्ही बस वेगात होत्या आणि एकमेकींना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे त्यांची समोरा-समोर जोरात धडक झाली. या धडकेमुळे या बसचं मोठं नुकसान झालं. तसेच घाबरलेल्या प्रवासांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. या अपघातात १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी येत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. आता या अपघाताबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.