३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकीचे फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:01 IST2022-01-25T07:01:15+5:302022-01-25T07:01:55+5:30
जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास मोदी सरकारबरोबरच सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप या दूरध्वनीतील संभाषणात करण्यात आला

३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकीचे फोन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरशी संबंधित ३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना सोमवारी सकाळी एका निनावी दूरध्वनीद्वारे धमक्या देण्यात आल्या. प्रजासत्ताकदिनी काश्मीरचा ध्वज दिल्लीत फडकविला जाईल, असाही इशारा या वकिलांना देण्यात आला आहे.
हा दूरध्वनी मुजाहिदीनने केल्याचा दावा करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास मोदी सरकारबरोबरच सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप या दूरध्वनीतील संभाषणात करण्यात आला. हा ऑटोेमेटेड कॉल होता.
वकिलांना निनावी दूरध्वनीद्वारे याआधीही धमक्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेचा भंग केल्याची जबाबदारी स्वीकारणारे निनावी दूरध्वनी सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना ब्रिटन, कॅनडातील क्रमांकांवरून आले होते. शीख फॉर जस्टिस या संघटनेने हे दूरध्वनी केल्याचा दावा करण्यात आला.
काय दिला इशारा पंतप्रधानांच्या पंजाबमधील सुरक्षेतल्या त्रुटींविरोधात दाखल झालेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी सुनावणीस घेऊ नये, असा इशारा या दूरध्वनींद्वारे देण्यात आला.