गांधी मैदानात जमले हजारो विद्यार्थी, प्रशांत किशोर यांनी केलं असं आवाहन, पाटण्यात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 18:33 IST2024-12-29T18:31:25+5:302024-12-29T18:33:25+5:30
BPSC Candidates Protest: बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) ७०व्या संयुक्त स्पर्धा प्राथमिक परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी रविवारी गांधी मैदानात आंदोलन आणि घोषणाबाजी केली.

गांधी मैदानात जमले हजारो विद्यार्थी, प्रशांत किशोर यांनी केलं असं आवाहन, पाटण्यात तणाव
बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) ७०व्या संयुक्त स्पर्धा प्राथमिक परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी रविवारी गांधी मैदानात आंदोलन आणि घोषणाबाजी केली. गांधी मैदानात विद्यार्थी संसदेचं आयोजन करण्यास परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही येथे हजारो विद्यार्थी आणि पालक पोहोचले होते. यावेळी बिहारच्या राजकारणात नव्याने उतरलेले प्रशांत किशोर यांनी विद्यार्थ्यांसोबत गांधी मैदानातून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी हा मोर्चा मध्येच रोखला. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गांधी मैदानामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करनाता प्रशांत किशोर यांनी सांगितले की, केवळ एक दिवस घोषणाबाजी करून काही होणार नाही. बिहारमधील विद्यार्थ्यांचं जीवन अनेक वर्षांपासून वाया जात आहे. ही लढाई दीर्घकाळापर्यंत चालवावी लागेल. तसेच तिला एका विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचवावं लागेल. शेतकरी दिल्लीमध्ये दीर्घकाळ तळ ठोकून बसले होते, तेव्हाच काहीतरी तोगडा निघाला होता, असं सांगत प्रशांत किशोर यांनी शेतकरी आंदोलनाचं उदाहरणही आंदोलक विद्यार्थ्यांना दिलं.
प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात आक्रमक झालेल्या या विद्यार्थी आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गांधी मैदानाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पोलिसांमधील तणाव वाढला होता. पोलीस माईकवरून विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या मूर्तीकडून बाजूला होण्याचं आवाहन करत होते.