अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:09 IST2025-12-19T15:08:29+5:302025-12-19T15:09:41+5:30

25000 reward for accident help : रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांसाठी बक्षिसाची रक्कम ५,००० वरून २५,००० रुपये करण्यात आली आहे. तसेच दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

Those who help accident victims will get Rs 25,000! Nitin Gadkari's big announcement; Free treatment up to Rs 1.5 lakh | अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 'गुड समॅरिटन' (मदतनीस) योजनेत मोठी सुधारणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्या व्यक्तीला आता २५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. यापूर्वी ही रक्कम केवळ ५,००० रुपये होती, ज्यामध्ये आता पाच पटीने वाढ करण्यात आली आहे.

जखमींना 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २५,००० रुपये आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस (मोफत) उपचार सरकार करणार आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीला 'राह-वीर' या पदवीने सन्मानित केले जाईल. ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गापुरती मर्यादित नसून राज्य महामार्ग, जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांवरील अपघातांसाठीही लागू असणार आहे. 

गडकरी यांनी राज्यसभेत माहिती दिली की, सरकार अशा मॉडेलवर काम करत आहे जिथे अपघातस्थळी अवघ्या १० मिनिटांत आधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका पोहोचेल. यासाठी राज्यांशी करार केले जात असून, तांत्रिकदृष्ट्या प्रगत हेल्पलाइन सिस्टीम उभारली जात आहे.

कायदेशीर कटकटीतून सुटका 
अनेकदा पोलीस चौकशी किंवा कोर्टाच्या फेऱ्यांच्या भीतीने लोक जखमींना मदत करण्यास टाळतात. मात्र, 'गुड समॅरिटन' कायद्यानुसार मदत करणाऱ्या व्यक्तीची कोणतीही सक्तीने चौकशी केली जाणार नाही किंवा त्यांना साक्षीसाठी अडकवले जाणार नाही, असेही पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Those who help accident victims will get Rs 25,000! Nitin Gadkari's big announcement; Free treatment up to Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.