Corona Vaccination : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी चाचणी करण्याची गरज नाही, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:41 IST2021-06-06T07:40:59+5:302021-06-06T07:41:24+5:30
Corona Vaccination : कोरोना लस घ्यायची की नाही व ती घेतल्यानंतरही काय काळजी घ्यायची, याबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ते लक्षात घेऊन, सीडीएसीने ही माहिती दिली आहे.

Corona Vaccination : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी चाचणी करण्याची गरज नाही, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचे मत
नवी दिल्ली : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याची किंवा क्वारंटाईन होण्याची गरज नाही, असे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने म्हटले आहे. अशा व्यक्ती जरी एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्या तरीदेखील त्यांनी कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असेही सीडीसीने सांगितले.
कोरोना लस घ्यायची की नाही व ती घेतल्यानंतरही काय काळजी घ्यायची, याबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. ते लक्षात घेऊन, सीडीएसीने ही माहिती दिली आहे.
कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीबाबत अमेरिकेत नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्याच्या निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला या आजाराचा गंभीर स्वरुपाचा संसर्ग होण्याची शक्यता उरत नाही. लस घेतलेल्या व्यक्तीला जर पुन्हा कोरोनाची लागण झाली, तर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची खूपच कमी शक्यता असते. कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीचे स्क्रिनिंग करण्याची गरज नाही, असे सीडीसीने म्हटले आहे.