सन २००८ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या हल्ल्यामधील एक प्रमुख आरोपी असलेला तहव्वूर राणा याच्या भारतातील प्रत्यार्पणास अमेरिकेतील न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राणा याला लवकरच भारताता आणलं जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देशात असलेल्या प्रत्यार्पणाच्या करारानुसार तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण करता येऊ शकतं, असा निकाला अमेरिकेतील अपिलीय न्यायालयाने ऑगस्ट २०२४ मध्ये दिला होता.
मुंबई पोलिसांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तहव्वूर राणा याचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट केलं होतं. तहव्वूर राणावर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा यांचा सक्रिय सदस्य म्हणून काम करण्याचा आरोप आहे. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याला मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबईमध्ये कुठे हल्ले करायचे आहेत. या सर्वांची रेकी तहव्वूर राणा यानेच केली होती. तसेच त्याबाबतची माहिती तयार करून ती दहशतवाद्यांना दिली होती. तहव्वूर राणा हा डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सईद गिलानी याचा बालपणीचा मित्र आहे. डेव्हिड हेडली हा अमेरिकन नागरिक आहे. त्याची आई अमेरिकन तर वडील पाकिसतानी होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी २००९ मध्ये डेव्हिड हेडली याला अटक केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये एका अमेरिकन न्यायालयाने डेव्हिड हेडली याला मुंबई हल्ल्यातील सहभागाबाबत दोषी मानून त्याला ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.