राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटन केंद्र असलेल्या माऊंट आबू येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी अल्पवयीन मुलींना आणण्यात येते, त्यामुळे हे ठिकाण आत बँकॉक बनत चालले असल्याचा धक्कादायक आरोप भाजपाच्या एका महिला नेत्याने केला आहे. भाजपाच्या जिल्हा मंत्री गीता अग्रवाल यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये हा दावा केला आहे. त्यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यासुद्धा उपस्थित होत्या.
गीता अग्रवाल यांनी केलेल्या या आरोपांनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सल्लागार संयम लोढा यांनी या दाव्यावरून भाजपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, हे आम्ही नाही तर तुमच्याच पक्षाच्या महिला पदाधिकारी सांगत आहेत. माऊंट आबूची परिस्थिती चिंताजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून इथे सुरू असलेला वेश्या व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा.
या प्रकरणी भाजपाचे आमदार बालमुकुंदाचार्य यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लहान लहान मुलांकडून अशी आनैतिक कृत्ये कोण करवून घेत आहेत, याचा तपास झाला पाहिजे. मी स्वत: याबाबत अनेकदा तक्रार केली आहे. कदाचित बाहेरून आलेले लोक या कृत्यामध्ये सहभागी असू शकतात. संपूर्ण राज्यामधून याची व्यापक चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.