"यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर केल्या, परत पुराव्यासांठी बोंब नको"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:02 IST2025-05-27T13:41:48+5:302025-05-27T15:02:40+5:30
"सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोरच केल्या", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर केल्या, परत पुराव्यासांठी बोंब नको"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून पुन्हा एकदा पाकिस्तानवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. दहशतवादाला आश्रय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने जर भारताविरुद्ध युद्ध पुकारले तर, त्यांनाही त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. तर, 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत त्यांनी विरोधकांना देखील टोले लगावले. "सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोरच केल्या", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी गांधीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल करत, ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.
With over two decades of transformative urban development, Gujarat is setting new benchmarks in building world-class cities. Addressing a programme in Gandhinagar. https://t.co/SY9QY6nqDB
— Narendra Modi (@narendramodi) May 27, 2025
यावेळी सगळं कॅमेरासमोर केलं!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'अवघ्या २२ मिनिटांत दहशतवाद्यांची ९ तळे उद्ध्वस्त करण्यात आली. नंतर कुणी पुरावे नाहीत, अशी बोंब करू नये, म्हणून यावेळी आधीच कॅमेऱ्यांची पूर्ण व्यवस्था केली होती. ६ मेची ती दृश्य बघितल्यावर कुणीही याला प्रॉक्सी वॉर म्हणू शकत नाही. यावेळी आम्हाला पुरावे द्यावे लागले नाहीत, त्यांनी समोरूनच परिस्थिती दाखवली."
विरोधकांना पुराव्यांवरून टोला
याआधी भारतीय सैन्याने पुलवामा आणि उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यावेळीही दहशतवाद्यांची तळे नष्ट केली गेली होती. मात्र, त्यावेळी काही विरोधीपक्ष नेत्यांनी पाकिस्तानचे किती नुकसान झाले, याचे पुरावे मागितले होते. तर, पाकिस्तानने त्यावेळीही आपले काहीच नुकसान झाले नाही, असे म्हटले होते. त्यामुळे देशातील विरोधीपक्ष नेते आणि पाकिस्तानचा सूर एक झाला होता. मात्र, यावेळी ऑपरेशन सिंदूर करताना सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या.