लग्नात DJ वाजवू नका अन् दारूही देऊ नका; मिळेल २१ हजारांचे बक्षीस, 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:02 IST2025-01-08T16:01:56+5:302025-01-08T16:02:32+5:30
गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्तीची मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लग्नात DJ वाजवू नका अन् दारूही देऊ नका; मिळेल २१ हजारांचे बक्षीस, 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
भटिंडा : पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील एका गावातील ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. भटिंडा जिल्ह्यातील बल्लो गावातील ग्रामपंचायतीने लग्नसमारंभात डीजे न वाजवणाऱ्या आणि दारू न देणाऱ्या कुटुंबाला २१ हजार रुपये रोख देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम पंचायत त्या कुटुंबाला प्रोत्साहन म्हणून देईल. गावाच्या हितासाठी आणि व्यसनमुक्तीची मोहीम म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
बल्लो गावच्या सरपंच अमरजीत कौर यांनी मंगळवारी सांगितले की, गावकऱ्यांनी लग्न समारंभांवर अनावश्यक खर्च करू नये आणि मद्यपानाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, साधारणपणे असे दिसून येते की, गावांमध्ये दारू दिली जाते आणि डिस्क जॉकी (डीजे) द्वारे मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे भांडणे होतात, असे अमरजीत कौर म्हणाल्या.
याचबरोबर, मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असल्याचे सरपंच अमरजीत कौर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, लग्न समारंभात व्यर्थ खर्च करू नये यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करू इच्छितो. तसेच, पंचायतीने ठराव केला आहे, ज्यानुसार जर एखाद्या कुटुंबाने दारू दिली नाही आणि लग्न समारंभात डीजे वाजवला नाही तर त्याला २१ हजार रुपये दिले जातील.
५ हजार आहे गावाची लोकसंख्या
बल्लो गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास आहे. अमरजीत कौर म्हणाल्या की, पंचायतीने सरकारकडे गावात स्टेडियम बांधण्याची मागणी केली आहे, जेणेकरून युवकांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच, गावात स्टेडियम असायला हवे जेणेकरून विविध खेळांचे आयोजन करता येईल. गावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्तावही पंचायतीने दिला आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.