हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:15 IST2025-04-27T12:15:23+5:302025-04-27T12:15:53+5:30
PM Modi Man ki Bat: माझ्या मनात खूप वेदना होत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. - मोदी

हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. आजचा त्यांचा हा १२१ वा भाग होता. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देणार असल्याचे सांगितले, तसेच पीडितांना न्याय देणार असल्याचे म्हटले.
माझ्या मनात खूप वेदना होत आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळत आहे, याची मला कल्पना आहे. काश्मीरमध्ये शांतता परतत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते. लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते. या गोष्टी देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना पहावल्या नाहीत. हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांची निराशा दर्शवितो, त्यांचा भ्याडपणा दर्शवितो, असे मोदी म्हणाले.
दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकाला काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला होता. परंतू, १४० कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. जग आपल्यासोबत आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.
देशाचे महान शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना गमावले आहे. विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेण्यात त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोला एक नवीन ओळख मिळाली. अंतराळ कार्यक्रमांमुळे भारताच्या प्रयत्नांना जागतिक मान्यता मिळाली. आज भारत वापरत असलेले अनेक उपग्रह डॉ. कस्तुरीरंगन यांच्या देखरेखीखाली प्रक्षेपित करण्यात आले, अशा शब्दांत मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली.