हे छुपे युद्ध नसून पाकने आखलेली रणनीतीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:33 IST2025-05-28T08:33:23+5:302025-05-28T08:33:30+5:30

भारत चोख प्रत्युत्तर देणार

This is not a secret war but a strategy planned by Pakistan says PM Narendra Modi | हे छुपे युद्ध नसून पाकने आखलेली रणनीतीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

हे छुपे युद्ध नसून पाकने आखलेली रणनीतीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

गांधीनगर : पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले म्हणजे छुप्या कारवाया नसून पाकिस्तानने ठरवून स्वीकारलेली रणनीती आहे आणि त्याला भारताकडून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिला. 

गुजरातच्या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी गांधीनगर येथे त्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार पाकिस्तानमध्ये शासकीय इतमामात करण्यात आले. त्यांचे मृतदेह पाकिस्तानी राष्ट्रध्वजात गुंडाळले होते. लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावरून हे स्पष्ट होते की, भारतावरील दहशतवादी हल्ले हे छुपे युद्ध नसून पाकिस्तानने आखलेली रणनीतीच आहे. 

ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या आपल्या पहिल्या गुजरात दौऱ्यात मोदींनी बडोदा, दाहोद, भूज, अहमदाबाद आणि गांधीनगरला भेट दिली. त्यांनी सांगितले की, १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मीरमध्ये घुसलेल्या मुजाहिदींना चिरडून टाकले असते तर हा प्रश्नच आज उरला नसता. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरपर्यंत जावे, असे सरदार पटेलांचे मत होते. पण त्यांचा सल्ला मान्य करण्यात आला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पाक म्हणे... मोदींचे विधान शांततेला धोका आहे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील विधानावर पाकिस्तानने आक्षेप व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने हिंसाचाराबद्दल बोलतात ते अणुशक्ती असलेल्या नेत्याला शोभणारे नाही. मोदींचे विधान केवळ द्वेष पसरवत नाही तर ते प्रादेशिक शांततेलाही धोका निर्माण करते. आम्हाला शांतता हवी आहे, पण जर आम्हाला धमकी दिली गेली तर आम्ही प्रत्युत्तर देऊ.

जिथे दहशतवादी हल्ला झाला तेथेच घेतली बैठक

पहलगाम : भ्याड दहशतवादी हल्ल्यांना सरकार घाबरणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित केली होती. 

आम्ही स्थानिकांसोबत आहोत. आम्ही हळूहळू काश्मीर आणि पहलगामला परतणाऱ्या सर्व पर्यटकांचे आभार मानण्यासाठी देखील आलो आहोत, असे अब्दुला म्हणाले.
 

Web Title: This is not a secret war but a strategy planned by Pakistan says PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.