याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 20:35 IST2025-09-13T20:34:50+5:302025-09-13T20:35:57+5:30
पंतप्रधान मोदींचे विमान ज्यावेळी इम्फाळ विमानतळावर उतरले, तेव्हा तेथे मुसळधार पाऊस सुरू होता. हवामान एवढे खराब होते की, चुडाचांदपूरचे हेलिकॉप्टर उड्डाण रद्द करावे लागले...

याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मणिपूरला पोहोचले. यावेळी, पुन्हा एकदा त्यांचा दृढनिश्चयाची झलक दिसून आली. खरे तर, पंतप्रधान मोदींचे विमान ज्यावेळी इम्फाळ विमानतळावर उतरले, तेव्हा तेथे मुसळधार पाऊस सुरू होता. हवामान एवढे खराब होते की, चुडाचांदपूरचे हेलिकॉप्टर उड्डाण रद्द करावे लागले. यानंतर, पंतप्रधानांनी रस्ते मार्गाने चुराचांदपूरला जाण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला लोकांना भेटायचे आहे, त्यांच्याशी बोलायचे आहे. यात हवामान अडथळा ठरू शकत नाही." इम्फाळ ते चुडाचांदपूर हे रस्ते मार्गाचे अंतर सुमारे दीड तासाचे आहे.
खरेतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस झाला. इंफाळमधील कांगला किल्ल्याच्या काही भागांत गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. चुराचांदपूर शहरातही मुसळधार पाऊस पडला. तथापि, पंतप्रधान वेळापत्रकानुसार लोकांना भेटण्यासाठी पोहोचले. पंतप्रधानांनी चुडाचांदपूर येथील शांतता मैदानावर अंतर्गत विस्थापितांची भेट घेतली. मे २०२३ मध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर राज्याच्या पहिल्या भेटीत कुकीबहुल चुडाचांदपूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या शांततेसाठीच्या सततच्या प्रयत्नांमुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली.
मणिपूर ही धैर्य आणि शौर्याची भूमी आहे, असे वर्णन करत पंतप्रधान म्हणाले, इंफाळहून रस्त्याने चुडाचांदपूरला येताना मिळालेले प्रेम आपण कधीही विसरू शकत नाहीत. मी विस्थापित लोकांशी बोललो, मी म्हणू शकतो की, मणिपूर एका नव्या सूर्योदयाकडे बघत आहे. लोकांनी शांतीचा मार्ग निवडला आहे. येथे हिंसाचार झाला हे दुर्दैव. आज, मी तुम्हाला वचन देऊ इच्छितो की, भारत सरकार तुमच्यासोबत आहे आणि मीही तुमच्यासोबत आहे.
मोदी म्हणाले, मी सर्व गटांना आणि संघटनांना शांततेचा मार्ग निवडण्याचे आवाहन करतो. विकासासाठी शांतता सर्वात महत्त्वाची आहे आणि केंद्र सरकार ती साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. केंद्र सरकारने राज्यातील रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवली आहे. मोदी म्हणाले, २०१४ पासून मी मणिपूरमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर विशेष भर दिला आहे.