Shashi Tharoor on Donald Trump Tariffs: "चीन आपल्यापेक्षा जास्त रशियाकडून तेल आयात करतो. पण, त्यांना टॅरिफ लागू करण्यास ९० दिवसांची मुभा देण्यात आली. अमेरिकेचा हा एकप्रकारे दुटप्पीपणाच आहे", अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ५० टक्के टॅरिफच्या निर्णयावर बोलताना थरूर यांनी मोदी सरकारला एक सल्लाही दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी २५ टक्के टॅरिफ आणि रशियातून आयात केल्या जाणाऱ्या तेलावर दंड आकारण्याची भूमिका घेतली होती. पण, त्यांनी टॅरिफ आणखी वाढवला. बुधवारी सायंकाळी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला. त्यामुळे भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवर पोहोचला आहे.
शशी थरूर म्हणाले, अमेरिकी लोकांसाठी आपल्या वस्तू महाग होतील
"हे आपल्यासाठी (भारत) चांगले नाहीये. यामुळे आपला एकूण टॅरिफ ५० टक्के होईल आणि आपल्या वस्तू अमेरिकेतील बहुसंख्य लोकांसाठी महाग होतील. विशेषतः तुम्ही जर बघितले तर आपल्या प्रतिस्पर्धी देशांवर भारताच्या तुलनेत खूप कमी टॅरिफ लावलेला आहे", असे थरूर म्हणाले.
"मला भीती वाटतेय. तुम्ही जर बघितले तर व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलीपाइन्स, इतकंच काय तर बांगलादेशवरही आपल्यापेक्षा कमी टॅरिफ आकारलेला आहे. त्यांना दुसरीकडे स्वस्त वस्तू मिळत असतील , तर अमेरिकेत लोक भारतातील वस्तू खरेदी करणार नाहीत", अशी चिंता थरूर यांनी व्यक्त केली.
मोदी सरकारला काय दिला सल्ला?
खासदार शशी थरूर पुढे म्हणाले, "याचा अर्थ असा आहे की, आता आपण खूप गंभीरपणे दुसऱ्या देशांकडे आणि दुसऱ्या बाजारपेठांच्या दिशेने बघितले पाहिजे. कदाचित आपण त्यांना काय देऊ, त्यात ते इच्छुक असू शकतात. आपण आता युकेसोबत व्यापार करार केला आहे. आपली युरोपियन युनियनसोबत बोलणी सुरू आहेत. अनेक देश आहेत, जिथे आपण जाऊ शकतो."
हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच; थरूर काय बोलले?
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ आकारत असल्याचे सांगितले. या मुद्द्यावर बोलताना शशी थरूर म्हणाले, "युरेनियम, पॅलेडियम आणि अशा वस्तू आहेत, ज्या ते (अमेरिका) रशियातून आयात करत आहेत. हा एक प्रकारे दुटप्पीपणाच आहे. त्यांनी चीनला ९० दिवसांची मुभा दिली आहे. चीन तर उलट भारतापेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी करत आहे."
"आपण यातून धडा घ्यायला हवा. मला वाटतं की, या गोष्टीची शक्यता आहे की, भारतानेही अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर जशास तसा टॅरिफ आकारण्यासाठी दबाव वाढू लागेल", असेही ट्रम्प म्हणाले.