कवठे यमाई परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:57+5:302015-02-15T22:36:57+5:30

कवठे यमाई परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
>सात घरे फोडली : ५० हजारांचा ऐवज लंपास कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गावठाणात रविवारी पहाटेस चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घरांना लक्ष करीत सात ठिकाणी घरफोड्या केल्या. काही मौल्यवान ऐवजासह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मुख्य गावठाणातच घरफोड्या झाल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरांना बाहेरून कड्या लावत गोंधळी आळीतील दिलीप रेणके, रज्जाक मोमीन, ग्रामपंचायत जवळ रहात असलेले सिंडिकेट बँकेचे विकास अब्दुले, बी. के. मोमीन, कवठेकर, बाबूराव रोकडे, पोखरकर यांची बंद घरे फोडून घरातील कपाटे व साहित्याची उलथापालथ करीत मौल्यवान वस्तू व रोख रकमेसह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास हनुमान मंदिर चौकात असणार्या सोनाराच्या दुकानाची कुलपे तोडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. यामुळे चोरट्यांनी मोटारसायकलींवरून पळ काढला. काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दोन मोटारसायकलींवरून सुमारे सहा चोरटे आल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस नाईक बाळकृष्ण साबळे व अन्य तीन पोलीस कर्मचारी २० मिनिटांतच घटनास्थळी पहाटे हजर झाले. आज दिवसभरात ठसेतज्ज्ञ व श्वान पथकही आले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास टाकळी हाजी पोलीस करीत आहेत.फोटो ओळ-कवठे येमाई येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या घरफोड्यांची पाहणी करताना सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व पोलीस कर्मचारी.