ऐकावं ते नवलंच! पैसे-दागिने नाही, तर चोरांनी चक्क मानी केस चोरले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:17 IST2025-01-19T16:16:08+5:302025-01-19T16:17:21+5:30
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

ऐकावं ते नवलंच! पैसे-दागिने नाही, तर चोरांनी चक्क मानी केस चोरले...
Crime News: हरियाणातील फरिदाबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. चोर घरात शिरुन पैसे अन् दागिन्यांची चोरी करतात. पण, फरिदाबादमध्ये चक्क मानवी केस चोरीला गेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले असून, त्यात दोन आरोपी केस चोरताना दिसत आहेत.
फरीदाबाद येथील सेक्टर 17 परिसरात राहणाऱ्या रणजीत मंडल नावाच्या व्यक्तीने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, रंजीत मूळ पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. फरिदाबादमध्ये तो बऱ्याच दिवसांपासून मानवी केसांचा व्यापार करतो. 14 जानेवारी रोजी 5 हजार रुपये किलो या दराने, त्याने सुमारे 150 किलो केस खरेदी केले आणि भाड्याने राहत असलेल्या घरात ठेवले.
चोर रात्री घरात शिरले अन् केसांच्या 4 बॅग घेऊन पळ काढला. या केसांचे वजन 110 किलो आहे. या केसांची किंमत 5.5 लाख रुपये आहे. तसेच, या केसांमध्ये त्याने आपले 2 लाख 13 हजार रुपयेही लपवले होते. अशाप्रकारे साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा माल आणि रोकड चोरीला गेली. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर फरीदाबाद पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध सुरू केला आहे.