देशाच अनेक अजब-गजब घटना घडत असतात. अशातच हरियाणात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मंदिरातील दानपेटीतून 5,000 रुपये लुटण्यापूर्वी एका चोराने 'हनुमान चालिसा' वाचली आणि देवाच्या चरणी 10 रुपये ठेवले. रेवाडीतील एका मंदिरातून ही अनोखी घटना समोर आली आहे. गुन्हा करण्यापूर्वी 'हनुमान चालीसा' वाचत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, चोर भक्त बनून हरियाणातील धारूहेडा शहरातील मंदिरात गेला. तो अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे देवाच्या पायाशी बसतो आणि हनुमान चालिसा म्हणू लागतो. नंतर तो देवाजवळ ठेवलेलं पुस्तक वाचू लागतो. तो भक्ताप्रमाणे वागतो आणि 'हनुमान चालिसा' म्हणतो. त्यावेळी इतर भक्त मंदिरात येऊन प्रार्थना करतात.
एका पुजार्याला पाहून तो खिशातून 10 रुपयांची नोट काढतो आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. काही मिनिटांनी आजूबाजूला कोणी नसताना, तो खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाहतो, दानपेटीतून काही पैसे काढतो आणि पळून जाण्यापूर्वी कपड्यांमध्ये लपवतो आणि पळ काढतो.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून चोरट्याचा शोध घेतला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या फरार असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मात्र, हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.