There is no right to violent movement as students are - cji Sharad Bobde | विद्यार्थी आहेत म्हणून कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ शकत नाहीत- शरद बोबडे
विद्यार्थी आहेत म्हणून कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ शकत नाहीत- शरद बोबडे

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्येकडील राज्ये पेटलेली आहेत. त्याचं लोण आता दिल्लीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन केलं. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून, मंगळवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडेंनी या हिंसाचाराचा निषेध नोंदवला आहे. सरन्यायाधीश एस. एस बोबडे म्हणाले, विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा त्यांना अधिकार नाही. विद्यार्थी असल्यानं ते कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ शकत नाहीत. प्रकरण शांत झाल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात आता काहीही टिपण्णी करण्याची योग्य वेळ नाही. हिंसाचार थांबल्यानंतर यावर चर्चा केली जाईल. तसेच ही हिंसा तात्काळ थांबली पाहिजे. दिल्ली पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था मजबूत केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे.

दुसरीकडे जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले असून, विद्यापीठाला बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. या आंदोलन व हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रोची जामिया, सुखदेव विहार, जसोला, शाहीन बाग व आश्रम रोडसह तेरा स्थानके काल संध्याकाळनंतर बंद करण्यात आली व गाड्यांचे तेथील थांबेही रद्द करण्यात आले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

या आंदोलनापायी विद्यापीठाने सर्व परीक्षा रद्द करून 5 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली. या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. शेकडो विद्यार्थी, तरुण, विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे प्रतिनिधी रविवारी जामियाजवळ जमले होते. सायंकाळी चार वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले. त्यांच्यासमोर एका राजकीय नेत्याचे भाषण झाले. जमावाचा त्यामुळेच भडका उडाला व बसेसची जाळपोळ सुरू झाली.

Web Title: There is no right to violent movement as students are - cji Sharad Bobde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.