'राहुल गांधी कधीही मोदी सरकारसमोर झुकले नाहीत', प्रियंका गांधींचा केंद्रावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:50 IST2026-03-10T17:48:21+5:302026-03-10T17:50:29+5:30
'राहुल गांधी या सभागृहात उभे राहून निर्भीडपणे सत्य बोलतात. मात्र ते सत्य सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही.'

'राहुल गांधी कधीही मोदी सरकारसमोर झुकले नाहीत', प्रियंका गांधींचा केंद्रावर निशाणा
नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार महागाई, बेरोजगारी आणि एलपीजी संकटासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, देशात असा एकच नेता आहे, जो गेल्या 12 वर्षांत सरकारसमोर कधीही झुकला नाही आणि तो म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहे.
सरकार महत्त्वाच्या मुद्द्यांपासून पळते
प्रियंका पुढे म्हणतात, राहुल गांधी या सभागृहात उभे राहून निर्भीडपणे सत्य बोलतात. मात्र ते सत्य सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. त्यांना थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात आला आणि सोशल मीडियावर मोहिमा राबवण्यात आल्या. पण सत्य सर्वांसमोर आहे. लोक पाहत आहेत की, राहुल गांधी सत्य बोलण्यापासून मागे हटत नाहीत. त्यामुळे सत्तेत बसलेल्यांना त्यांच्या आवाजाची भीती वाटते.
एक ही व्यक्ति है इस देश में, जो 12 साल में इनके सामने झुका नहीं है।
— Congress (@INCIndia) March 10, 2026
वो नेता विपक्ष राहुल गांधी जी हैं।
वो इस सदन में खड़े होकर बेझिझक सच बोलते हैं और सच इनसे पचता नहीं है।
: लोकसभा में कांग्रेस महासचिव व सांसद श्रीमती @priyankagandhi जी pic.twitter.com/NuhwDYW05p
भविष्यात संकट वाढू शकते
प्रियंका गांधी यांनी इशारा दिला की, देशासमोर येत्या काळात मोठे संकट उभे राहू शकते. देशातील मोठ्या प्रमाणावरची संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात दिली जात आहे. या संदर्भात प्रश्न विचारल्यास सरकारकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही. संसदेत वंदे मातरम, नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्याबाबत चर्चा होते; मात्र महागाई, बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करारांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. देशातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अमेरिका व्यापार करारावरही प्रश्न
प्रियंका गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, या करारात भारताने अमेरिकेसमोर झुकल्याचे दिसते. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाची परिस्थिती निर्माण होत असल्याने देशावर आर्थिक आणि ऊर्जा संकट वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रियंकांनी यावेळी देशातील एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किंमती आणि कमर्शियल गॅसच्या तुटवड्याचा मुद्दाही उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधीच सरकारला ऊर्जा संकटाबाबत इशारा दिला होता. आता देशात एलपीजी सिलेंडरची कमतरता आणि वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असा दावाही त्यांनी केला.