या गावात वीस वर्षांपासून पोलीस ठाण्यात नाही कोणतीही तक्रार, हरयाणात बिढाईखेडा गावात बंधुभावाचा नवा आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 15:17 IST2022-09-08T15:17:28+5:302022-09-08T15:17:55+5:30
गावातील प्रत्येक प्रकरण सहमतीने किंवा पंचायतीच्या बैठकीत सोडविले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास ७५० आहे. येथे १२५ घरे आहेत.

प्रतिकात्मक फोटो.
बलवंत तक्षक
चंदिगड : हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात बिढाईखेडा गावात बंधुभावाचा आदर्श गावकऱ्यांनी निर्माण केला आहे. गत २० वर्षात या गावात ना कधी भांडण झाले ना पोलीस ठाण्यात तक्रार गेली. राज्याचे पंचायत व ग्रामीण विकास मंत्री देवेंद्र सिंह बबली हे याच गावचे आहेत.
गावातील प्रत्येक प्रकरण सहमतीने किंवा पंचायतीच्या बैठकीत सोडविले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास ७५० आहे. येथे १२५ घरे आहेत. जाट बाहुल्य असलेल्या या गावात सहा वॉर्ड आहेत. तर, ३७९ मतदार आहेत. बिढाईखेडा गावात २०१० मध्ये प्रथमच ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती. यापूर्वीही हे गाव डांगरा पंचायतीशी जोडलेले होते. या गावाने पहिल्या वेळी कलावती यांना सर्व सहमतीने सरपंच निवडले होते.
२०१६ मध्ये गावातील लोकांनी रामचंद्र बराला यांना सरपंच निवडले आणि निश्चित केले की, कोणतेही प्रकरण असो, पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मध्यस्थीने आणि सहमतीने प्रकरणावर तोडगा काढला जावा. बराला यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात जाण्याबाबत ग्रामस्थ विचारही करत नाहीत. गत दोन दशकांपासून हीच परंपरा सुरु आहे.