"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 18:53 IST2024-11-30T18:52:51+5:302024-11-30T18:53:18+5:30
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजेंद्र गुप्ता यांना एक अनोखी ऑफर दिली आहे.

"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
दिल्लीमध्ये लवकरच विधानसबा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी येथे विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. हे निवडणुकीपूर्वीचे शेवटचे अधिवेश आहे. यामुळे राजकीय विधानेही होतानाही दिसत आहेत. यातच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजेंद्र गुप्ता यांना एक अनोखी ऑफर दिली आहे.
खरे तर, दिल्ली विधानसभेत बस मार्शल नियमित करण्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज, आतिशी आंदोलक बस मार्शल नियमित करण्याच्या चर्चेला उत्तर देत होत्या. दरम्यान त्यांनी, विजेंद्र यांनी बस मार्शल नियमित करण्याच्या प्रस्तावाला एलजीची मान्यता मिळवून दिली तर, आतिशी त्यांच्या विरोधात पुढील निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार न उतरवण्याचा प्रस्ताव ठेवेल, अशी ऑफर विजेंद्र गुप्ता यांना दिली.
विजेंद्र गुप्ता हे सलग दोन वेळा दिल्लीच्या रोहिणी येथून आमदार झाले आहेत. आतिशी एवढ्यावरच थांबल्या नाही, तर आपण उमेदवार तर सोडाच, पण विजेंद्र गुप्ता यांच्यासाठी रोहिणी येथे जाऊन निवडणूक प्रचारही करू असेही त्या म्हणाल्या.
काय आहे बस मार्शलची मागणी? -
दिल्लीतील 10 हजारांहून अधिक बस मार्शल गेल्या एका वर्षाहून अधिक काळापासून रोजगाराच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहेत. आपल्याला नोकरीत नियमित करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. यापूर्वी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यासह सर्व उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांचे दरवाजेही ठोठावले आहेत. मात्र, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.