...तर भारत फायनल जिंकला असता : ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 05:37 IST2023-11-24T05:37:22+5:302023-11-24T05:37:52+5:30
आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे

...तर भारत फायनल जिंकला असता : ममता बॅनर्जी
कोलकाता : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता किंवा मुंबईत खेळवला असता तर भारत जिंकला असता, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला. येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. देशाच्या क्रिकेट संघाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
बॅनर्जी म्हणाल्या, ‘आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे आणि माझा विश्वास आहे की अंतिम सामना कोलकाता किंवा वानखेडे (मुंबई) येथे झाला असता तर आम्ही विश्वचषक जिंकला असता. त्यांनी (भाजप) भगव्या जर्सी देऊन भारतीय क्रिकेट संघाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंनी विरोध केला. त्यामुळे त्यांना सामन्यांदरम्यान त्या जर्सी घालाव्या लागल्या नाहीत. ते संपूर्ण देश भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशीही टीका त्यांनी केली.