उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे होणाऱ्या जावयासोबत सासू फरार झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे लग्न निश्चित झालेल्या मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, होणाऱ्या जावयासोबत फरार झालेल्या या सासूचा ठावठिकाणा शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. या दोघांचाही शोध घेण्यासाठी सर्व्हिलान्सची मदत घेण्यात आली होती. त्यामध्ये हे दोघेही उत्तराखंडमध्ये असल्याचं समोर आलं आहे. तसेच ते बसने अलिगडमधून उत्तराखंडमध्ये गेल्याची माहितीही पोलिसांच्या तपासामधून समोर आली आहे.
अलिगडमधील या सासूने नुकताच जावयाला स्मार्टफोन घेऊन दिला होता. त्यानंतर नवरी मुलगी नाही तर होणारी सासू आणि होणारा जावईच फोनवर जास्त बोलायचे. यामुळे त्यांचे सूत जुळले. ही सासू दिवसामधील १५-१५ तास त्याच्याशी फोनवर बोलायची. नवरा बाहेरगावी असल्याने त्याच्याही या गोष्टी लक्षात आल्या नाहीत. दरम्यान, ही महिला होणाऱ्या जावयासोबत पळून जाताना घरातील दागदागिने आणि रोख रक्कमही घेऊन गेल्याचं समोर आलं आहे.
होणाऱ्या जावयासोबत फरार झालेल्या महिलेच्या पतीने याबाबत सांगितले की, मी लग्नाची पत्रिका देण्यासाठी मेहुणीच्या घरी गेलो होतो. जेव्हा पत्रिका देऊन माघारी परतलो, तेव्हा पत्नी घरात नसल्याचे समोर आले. ती कदाचित बाजारात गेली असावी, असं वाटलं. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती न आल्याने मी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.
याचदरम्यान, होणारा जावईसुद्धा घरातून बेपत्ता असल्याचं समोर आलं. त्यामुळे हे दोघेही एकत्रच गेले असावेत, अशी शंका कुटुंबीयांना आली. दरम्यान, आता पोलिसांनी दोघांचंही लोकेशन उत्तराखंडमध्ये शोधून काढलं आहे. होणारा जावई आधी तिथेच नोकरी करत होता. आता पोलिसांचं एक पथक दोघांचाही शोध घेण्यासाठी रुद्रपूर येथे रवाना झालं आहे.