पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:31 IST2025-08-07T14:30:51+5:302025-08-07T14:31:45+5:30
या प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
कर्नाटकातील हसन येथील माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर ४७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या तपासात एका साडीने महत्त्वाची भूमिका बजावली. ही साडी पीडितेची होती आणि ती गुन्ह्याच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली होती.
साडीने रेवण्णांना तुरुंगात कसे पाठवले?
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, बलात्कारानंतर प्रज्वलने पीडितेची साडी जबरदस्तीने काढून घेतली होती. त्यानंतर त्याने ती फार्महाऊसमधील एका खोलीमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप आहे. तपासणीदरम्यान, पोलिसांनी पीडितेला घटनेच्या वेळी तिने काय परिधान केले होते, हे विचारले. तेव्हा तिने साडी नेसली असल्याचं सांगितलं आणि प्रज्वलने ती साडी परत न दिल्याने ती अजूनही फार्महाऊसवर असू शकते, अशी माहिती दिली.
या माहितीच्या आधारावर पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला आणि ती साडी जप्त केली. ही साडी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. तपासणीत साडीवर वीर्य आढळून आलं आणि डीएनए चाचणीत ते प्रज्वलशी जुळत असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे पीडितेच्या जबाबासोबतच ही साडी रेवण्णा यांना दोषी ठरवण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा ठरली.
शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वल तुरुंगात रडले
या प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांना जन्मठेप आणि ११.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील ११.२५ लाख रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या चार प्रकरणांपैकी एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं. आता प्रज्वल यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी केली आहे.
विशेष म्हणजे, शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगातील पहिल्या रात्री प्रज्वल खूप दुःखी होते आणि ते रडले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान ते रडत होते आणि त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर आपलं दुःख व्यक्त केलं, असंही त्यांनी सांगितलं.