'सत्य लपवता येत नाही, संभल आपलं तेच रुप दाखवत आहे'; योगी आदित्यनाथांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:21 IST2025-01-27T10:17:24+5:302025-01-27T10:21:15+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील मुद्द्यावर भाष्य करताना एक विधान केलं आहे. संभलचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर आइन-ए-अकबरी वाचा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला.

'सत्य लपवता येत नाही, संभल आपलं तेच रुप दाखवत आहे'; योगी आदित्यनाथांचं विधान
Yogi Adityanath Sambhal News: संभलमधील जामा मशिदीचा मुद्दा देशभरात चर्चेत असून, याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं. 'संभल विष्णूचा दहावा अवतार श्री हरिंची भूमी आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे सत्य पुराणांच्या आधारावर बघितलं पाहिजे', असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "अबुल फजल यांनी त्यांच्या आइन-ए-अकबरी पुस्तकात ही गोष्ट सांगितली आहे. मीर बाकीने १५२६ मध्ये श्री हरि विष्णू मंदिर तोडले आणि मशिदीचा ढाचा उभा केला. त्यापूर्वी पुराणांमधील जो इतिहास आहे, ३५०० ते ५००० वर्षांचा जो कालखंड आहे. पहिले महापुराण श्रीमद भागवत पुराण आहे. त्यानंतर १८ महापुराण लिहिले गेले. अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे की, विष्णूचा दहावा अवतार येईल आणि त्याची भूमी संभल असेल."
अयोध्येतील राम मंदिर का तोडले?
योगी आदित्यनाथ म्हणाले, "मी विचारू इच्छितो की, मीर बाकीने १५२६ मध्ये संभल आणि १५२८ मध्ये अयोध्येत जिथे राम जन्मभूमि आहे. तिथले मंदिरं का तोडली? याचा अर्थ १६व्या शतका ते सगळ्यात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक होते. तिथे लोकांची श्रद्धा होती. तिथे जे पुरातत्व अवशेष मिळत आहे, जे पुरावे मिळत आहेत, ते हे सिद्ध करतात की, तिथे मंदिर पाडून नवी बांधकाम केले गेले", असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.
सवंग लोकप्रियतेसाठी याचिका दाखल करणे चुकीचे -योगी आदित्यनाथ
'सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे', असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
संभलचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. योगी आदित्यनाथ या याचिकांबद्दल भाष्य करताना म्हणाले, "इस्लामचा उदय १४०० वर्षांचा इतिहास आहे. तर पुराणांचा इतिहास २००० वर्ष जुना आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी योग्य म्हटलं की, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी जो तो उठून एक जनहित याचिका दाखल करतोय. ही काय पद्धत आहे. ज्यात तथ्य आहे, ते मुद्दे तुम्ही मांडा", अशी भूमिका योगी आदित्यनाथ यांनी मांडली.
"तुम्ही सत्य जास्त दिवस लपवू शकत नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येतच आणि त्याचं योग्य ते रुप दाखवतं. संभल आता त्याचं तेच रुप दाखवत आहे", असे विधान योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील वादावर केलं.