सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:36 IST2023-11-02T12:34:27+5:302023-11-02T12:36:51+5:30
सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन

सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
कलवाकुर्थी (तेलंगणा) : मागील १० वर्षांपासून तेलंगणमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, भाजप आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षांनी हातमिळवणी केलेली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचारसभेत केला. आसाम, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, त्रिपुरा अशा कोणत्याही राज्यात जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत असते तिथे एमआयएमकडून उमेदवार उभे केले जातात, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही स्वप्न पाहिले होते इथे जनतेचे राज्य असावे. परंतु, गेली १० वर्षांपासून इथे एकाच परिवाराची सत्ता आहे. हा परिवार मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आहे. केसीआर सरकारने कालेश्वरम प्रकल्पाच्या नावाखाली जनतेच्या एक लाख कोटी रुपयांची चोरी केली आहे. आता त्यांची सत्तेतून जाण्याची वेळ आली आहे. जडचेरला येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले.
भाजप ओबीसी मुख्यमंत्री कसा बनविणार?
भाजपने राज्यात ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर भाजपला या राज्यात केवळ दोन टक्के मते मिळणार असतील तर तुम्ही मुख्यमंत्री कसा काय बनविणार ?