भारत आपल्या जुन्या मित्राला सोबत घेणार, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची हवा काढणार, अशी आहे रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:14 IST2025-03-05T17:11:41+5:302025-03-05T17:14:01+5:30
India-Russia News: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला आपला जुना मित्र असलेल्या रशियाची आठवण झाली असून, रशियासोबत मिळून या टॅरिफ वॉरचा सामना करण्याची तयारी भारताने केल्याचे संकेत मिळत आहेत.

भारत आपल्या जुन्या मित्राला सोबत घेणार, ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची हवा काढणार, अशी आहे रणनीती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अमेरिकेसोबतच्या व्यापारावरून जगभरातील देशांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून निर्यात होणाऱ्या मालावर अतिरिक्त कर आकारणाऱ्या देशांच्या वस्तूंवर अतिरिक्ट टॅरिफ आकारण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प देत आहेत. ट्रम्प यांच्या या टॅरिफ वॉरचा फटका भारतालाही बसण्याची चिन्हे दिसत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारताला आपला जुना मित्र असलेल्या रशियाची आठवण झाली असून, रशियासोबत मिळून या टॅरिफ वॉरचा सामना करण्याची तयारी भारताने केल्याचे संकेत मिळत आहेत.
भारत आणि रशियामध्ये होणाऱ्या वार्षिक संवादासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे रशियामध्ये जाणार आहेत. ७ मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांवर चर्चा केली जाईल. तसेच या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या टॅरिफ वॉरच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. रशियामध्ये परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्त्री हे त्यांचे रशियातील समकक्ष अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतीत. आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान विक्रम मिस्त्री हे रशियातील सर्वोच्च नेतृत्वाचीही भेट घेण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांना महत्त्वपूर्ण स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवरील विचारांचं आदान प्रदान करण्याची संधी मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करणे हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. विशेष करून भारताकडून होणाऱ्या निर्यातीला वाढवून द्विपक्षीय व्यापाराला संतुलित बनवण्याच्या प्रयत्नांवर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. पाश्चात्य देशांच्या अतिरिक्त निर्बंधांनंतरही भारताला रशियाकडून होणारा उर्जेचा पुरवठा कायम ठेवणं हासुद्धा चर्चेचा विषय असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र सचिवांच्या रशिया दौऱ्यामध्ये होणाऱ्या बैठतीत वरील मुद्दे प्रामुख्याने समोर येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये सुमारे ६६ अब्ज डॉलर एवढ्या रकमेचा व्यापार होत आहे. मात्र हा व्यापार रशियाकडे झुकलेला आहे. २०२२ पासून रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात करत असलेली खनिज तेलाची खरेदी हे त्यामागील एक कारण आहे. आता भारताने या व्यापारामध्ये संतुलन प्रस्थापित करण्यासाठी रशियन बाजारांमध्ये भाला अधिकाधिक प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे.
भारताच्या परराष्ट्र सचिवांचा हा दौरा युक्रेनमधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी नव्याने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती भारताला देण्याची रशियाकडे असलेली एक संधी आहे, असे मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी साधलेला संपर्क आणि युरोपियन देशांना संपर्षण देण्याच्या अमेरिकेच्या पारंपरिक धोरणापासून मागे हटल्यानंतर भारत आणि रशियामध्ये दोन्ही देशांमधील परस्पर संबंध मजबूत करण्यासाठी आणि परस्पर सहकार्य वाढवण्याची उत्तम संधी म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.