विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:54 IST2025-09-29T05:54:25+5:302025-09-29T05:54:44+5:30

मृतांत ४ लहान मुले, ५ मुली, १७ महिलांचा समावेश; अभिनेता विजयक़डून मृतांच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत; निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती नेमली.

The stampede in tamilnadu for actor vijay turned deadly; The death toll in the Tamil Nadu stampede has crossed 40. | विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

चेन्नई / करुर (तामिळनाडू) : अभिनेता - राजकीय नेता विजय याच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या करूर येथील जाहीर सभेत शनिवारी झालेल्या भयंकर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४० झाली आहे. यात ४ लहान मुले, ५ मुली व १७ महिलांचा समावेश आहे. विजयसाठी चाहत्यांची उडालेली झुंबडच जीवघेणी ठरल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख, तर जखमींना प्रत्येकी १ लाख मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. विजय यांनीही  प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी  दु:ख व्यक्त करून निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या नेतृत्त्चाखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. दरम्यान, याप्रकरणी मंत्री शोक करतानाचा व्डिडीओ व्हायरल झाला आहे.

४० जीव घेणारी ही असू शकतात कारणे; काही लोक बेशुद्ध पडले आणि गर्दी अनियंत्रित 

विजय यांना सहा तास विलंब  : नियोजित वेळेपेक्षा विजय सभास्थळी सहा तास विलंबाने रात्री पावणेआठच्या सुमारास आले. कित्येक तास पाणी नाही, ना काही खाण्याची सोय. यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. काही लोक बेशुद्ध पडले आणि गर्दी अनियंत्रित होत गेली.

क्षमतेपेक्षा अधिक लोक आले : करूर येथील ज्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याची क्षमता सुमारे १० हजार लोकांची होती. प्रत्यक्षात ३० हजारांहून अधिक लोक आले. अनपेक्षित गर्दी वाढल्याने पोलिस आणि यंत्रणेचे नियंत्रण राहिले नाही. यातून चेंगराचेंगरी झाली.

पाण्याच्या बाटल्या फेकल्या  : भाषणादरम्यान तासनतास उभ्या चाहत्यांची झालेली अत्यंत वाईट दशा पाहून त्यांच्या दिशेने विजय यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांच्या दिशेने फेकल्या. त्यामुळे उडालेल्या धावपळीत  अघटित घडले.  या घटनेनंतर जिकडे तिकडे चपलांचा मोठ्या प्रमाणावरील ढीग पसरल्याचे चित्र होते. यावरूनच गर्दीचा अंदाज येत होता.

नमक्कलच्या सभेतून धडा घेतला असता तर...

शनिवारी नमक्कल येथेही नियोजित वेळेनुसार सकाळी ८.४५ वाजता विजय यांची सभा होती. परंतु, ते पोहोचले पावणेतीन वाजता. तोवर उष्णता-उकाडा आणि तहानलेले चाहते चक्कर येऊन पडू लागले. तेथेही गर्दी अनियंत्रित झाली होती. काहीजण जखमी झाले. त्यातून कोणताही धडा न घेता पुन्हा करूर येथे त्याच पद्धतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. नेमके ते जीवघेणे ठरले. 

विजय थेट चेन्नईला रवाना

चेंगराचेंगरी झाल्यानंतर टीव्हीकेचे नेते विजय भाषण थांबवून थेट त्रिची विमानतळावर दाखल झाले आणि तेथून चेन्नईला रवाना झाले. त्यांनी ना जखमींची भेट घेतली ना सांत्वन केले. फक्त सोशल मीडियावर याबाबत दु:ख व्यक्त करून मदत जाहीर केली. 


सेलिब्रिटींसाठी  झालेल्या चेंगराचेंगरीच्या अलीकडील काही घटना

४ जुलै २०२५
कुठे : बंगळुरू
कारण : आयपीएल विजय उत्सव
मृत्यू : ११

४ डिसेंबर २०२४
कुठे : हैदराबाद 
कारण : ‘पुष्पा-२’ चित्रपटाचे स्क्रीनिंग

४ ऑगस्ट २०१८
कुठे :  कोट्टारकारा
कारण : अभिनेता डुलकरच्या हस्ते मॉलचे उद्घाटन

१७ मार्च २०१३
कुठे : तेलंगणा
कारण : ज्युनिअर एनटीआरचे म्युझिक रिलीज

Web Title: The stampede in tamilnadu for actor vijay turned deadly; The death toll in the Tamil Nadu stampede has crossed 40.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.