भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील, लष्करप्रमुखांच्या विधानानं चिंता वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 17:44 IST2024-01-11T17:42:46+5:302024-01-11T17:44:15+5:30
India-China LAC: भारताचे लष्करप्रमख जनरल मनोज पांडे यांनी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर पण संवेदनशील असल्याची माहिती दिली आहे.

भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती संवेदनशील, लष्करप्रमुखांच्या विधानानं चिंता वाढवली
भारताचे लष्करप्रमख जनरल मनोज पांडे यांनी भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर पण संवेदनशील असल्याची माहिती दिली आहे. जनरल मनोज पांडे यांनी पूर्व लडाखमधील वादावर चीनचं नाव न घेता सांगितलं की, उत्तर सीमेवरील परिस्थिती सामान्य होण्याबरोबरच संवेदनशीलसुद्धा आहे. लष्कर प्रमुखांनी सांगितले की, येथील परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेसे लष्करी सैन्य तैनात आहे. तसेच सैन्याची संख्या ही कायम राखली जाईल.
पूर्व लडाखमधील परिस्थितीबाबत जनरल पांडे यांनी सांगितले की, आमची हालचालींची तयाकरी उच्च स्तरावर आहे. पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. माध्यमांशी बोतलाना त्यांनी पुढे सांगितले की, २०२३ मध्ये देशाच्या सीमेवरील हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. तसेच जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागामध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्येही घट नोंदवली गेली आहे.
लष्करप्रमुखांनी पुढे सांगितले की, भारतीय लष्कराने राष्ट्रहितासाठी मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लष्करामध्ये वेळेच्या मागणी अनुरूप आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला अधिक सामंजस्यपूर्ण आणि भक्कम बनवण्यात आलं आहे. यावेळी मणिपूरमधील स्थितीबाबत लष्करप्रमुखांनी सांगितले की, संयुक्त प्रयत्नांमुळे मणिपूरमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणावर शांतता प्रस्थापित झाली आहे.
लष्करामध्ये नवं तंत्रज्ञान आणलं जात आहे. उत्तम दळणवळण आणि संचार व्यवस्था, ड्रोन आणि सर्विलेंस सर्वांना समाविष्ट केले जात आहे. भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भक्कमपणे पुढे जात आहे. भारतीय लष्कर देशातील विविध एजन्सी आणि राज्याच्या सरकारांसोबत मिळून काम करत राहतील, असेही त्यांनी सांगितले.