जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंडप सजला होता. बॅन्ड बाजाच्या तालावर वऱ्हाडी मंडळी जोरदार नाचत होते. मंडपात वधू वराचा प्रवेश झाला होता. भटजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. त्याचवेळी अचानक वर स्वतःचंच लग्न सोडून मांडवातून पसार झाला. त्याचं झालं असं की महादेव बेटिंग अॅप खटल्यामध्ये फरार आरोपी असलेल्या सौरभ आहुजा याला पकडण्यासाठी लग्न सोहळ्याच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या इडीने धाड टाकली होती.
या प्रकरणातील एक आरोपी असलेला सौरभ हा गुपचूप लग्न करत असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर ईडीने लग्नाच्याच दिवशी धाड टाकण्याचे निश्चित केले. आरोपी सौरभ आहुजा याला सप्तपदी झाल्यानंतर अटक करायची असे इडीने निश्चित केले होते. मात्र इडीच्या छाप्याची कुणकुण सौरभ याला आधीच लागली. त्यानंतर तो बोहल्यावरूनच पसार झाला. या प्रकारामुळे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, या खटल्याची संबंधित प्रणवेंद्रसह इतर तीन आरोपींना पोलिसांनी पकडले. तेव्हा सर्वांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती झाली. त्यानंतर इडीच्या अधिकाऱ्यांनी नववधूकडे चौकशी केली. मात्र त्यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. मात्र या प्रकारामुळे नववधूला जबर धक्का बसला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध देवाणघेवाणीप्रकरणी रायपूर ईडीची टीम जयपूर येथे आली होती. तिथे त्यांनी सौरभ आहुजा याला पकडण्यासाठी धाड टाकली. मात्र सौरभ आहुजा हा आधीच तिथून फरार झाला.