गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटलेला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने उचललेल्या या पावलाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, मतदार यादी पुनरीक्षणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. बिहारमधील मतदार यादीमधून सुमारे ५१ लाख मतदारांची नावं हटवण्यात येणार आहेत. यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये १८ लाख मतदार मृत, तर २६ लाख मतदारस कायमस्वरूपी स्थलांतरीत झाल्याचे आढळून आले. त्याशिवाय ७.५ लाख मतदारांची नावं ही अनेक ठिकाणी नोंदवलेली असल्याचे आढून आले आहे.
निवडणूक आयोगाने याबाबत सांगितले की, तपासणीदरम्यान, १८ लाख मतदारांचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २६ लाख मतदार हे बिहारच्या बाहेर किंवा इतर विधानसभा मतदारसंघात स्थायिक झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय, ७ लाख मतदारांनी दोन ठिकाणी आपली नोंदणी करून ठेवली होती. अशा कारणांमुळे सुमारे ५१ लाख मतदारांची नावं मतदार यादीमधून हटवण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीमध्ये केवळ पात्र मतदारांचाच समावेश केला जाणार आहे.
निवडणूक आय़ोगाने सांगितले की, २१ जुलै २०२५ पर्यंत घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ११ हजार मतदारांबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. आता १ ऑगस्ट रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १ सप्टेंबरपर्यंत त्यातील नोंदी आणि आक्षेप स्वीकारले जातील. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.