भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:14 IST2025-09-26T13:13:36+5:302025-09-26T13:14:00+5:30
आपल्या कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातही या 'फ्लाइंग मशीन'ने पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाचा वेध घेऊन आपला दबदबा सिद्ध केला होता.

भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
भारतीय हवाई दलाचा अनेक वर्षांचा आधारस्तंभ राहिलेले 'MiG-21' हे लढाऊ विमान आज, २६ सप्टेंबर रोजी सेवेतून निवृत्त झाले आहे. भारताचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान असलेल्या 'मिग-२१' ने १९६५, १९७१ आणि कारगिलच्या १९९९ च्या युद्धात पाकिस्तानच्या सैनिकांना अक्षरशः धडकी भरवली होती.
#WATCH | Chandigarh | All airborne MIG-21 aircraft execute their final operational landing simultaneously.
— ANI (@ANI) September 26, 2025
MiG-21s were inducted into the Indian Air Force in 1963, and will be decommissioned today after 63 years of service. pic.twitter.com/uDnMXpG0Rr
आपल्या कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातही या 'फ्लाइंग मशीन'ने पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाचा वेध घेऊन आपला दबदबा सिद्ध केला होता. चंदीगड येथे आयोजित एका विशेष समारंभात मिग-२१ ला अखेरची मानवंदना दिली गेली.
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत समारंभ!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या सेवामुक्ती समारंभात विशेष उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला सीडीएस जनरल अनिल चौहान, सीओएएस जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सीएनएस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे देखील उपस्थित आहेत.
सेवामुक्ती समारंभापूर्वी विंग कमांडर (निवृत्त) राजीव बत्तीश यांनी मिग-२१ बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. "मिग-२१ चा प्रवास खूप मोठा आणि ऐतिहासिक आहे. या विमानाला निरोप देण्यासाठी इतके लोक जमले आहेत, हेच या विमानाचे महत्त्व सिद्ध करते," असे ते म्हणाले. "भारताच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, सर्वाधिक वैमानिकांनी उडवलेले लढाऊ विमान म्हणजे मिग-२१ आहे. हे अत्यंत शक्तिशाली विमान होते," असेही ते म्हणाले.
#WATCH | Chandigarh | MIG-21 aircraft flies in formation with indigenous Tejas Aircraft, giving out the message 'I hand over the glory to the next lineage'.
MiG-21s were inducted into the Indian Air Force in 1963, and will be decommissioned today after 63 years of service. pic.twitter.com/pXwDmDb5fx— ANI (@ANI) September 26, 2025
'मिग २१'ची खास वैशिष्ट्ये:
मिग-२१ हे लहान डिझाइनचे पण अत्यंत शक्तिशाली विमान म्हणून ओळखले जात होते, जे जलद हल्ला आणि हवाई युद्धासाठी महत्त्वपूर्ण मानले गेले. मिग-२१चा कमाल वेग सुमारे २,२०० किलोमीटर प्रति तास इतका होता. हे विमान १७,५०० मीटरपर्यंतच्या उंचीवर उड्डाण करू शकत होते. यात हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जात होती. अनेक दशके भारताच्या हवाई संरक्षणाची धुरा वाहिलेल्या या 'हिरो' विमानाला आज सन्मानाने निरोप दिला गेला.