पगार न मिळाल्याने चक्क न्यायाधीश गेले सुप्रीम कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:49 AM2024-01-15T07:49:57+5:302024-01-15T07:50:39+5:30
न्यायाधीश मिश्रा यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र, बिहार सरकार आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली : पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रुद्र प्रकाश मिश्रा यांनी न्यायाधीश झाल्यानंतर पगार न मिळाल्याने आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) खाते न उघडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायिक सेवेचे अधिकारी मिश्रा नोव्हेंबर २०२३ मध्ये न्यायाधीश झाले आहेत.
न्यायाधीश मिश्रा यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र, बिहार सरकार आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना नोटीस बजावली आहे. खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकील प्रेम प्रकाश यांनी अंतरिम दिलासा मागितला. परंतु न्यायालयाने दिलासा न देता नोटीस बजावून २९ जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचे सांगितले.
उच्च न्यायिक सेवेतून उच्च न्यायालयात पदोन्नतीनंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अद्याप त्यांचे जीपीएफ खाते उघडण्यात आलेले नाही आणि त्यांचे वेतनही मिळालेले नाही, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. यामुळे त्यांची मानसिक आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.