पाहुणे जेवणार सोन्या-चांदीच्या ताटात; २०० कारागिरांनी बनवली १५,००० चांदीची भांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 08:41 IST2023-09-07T08:40:42+5:302023-09-07T08:41:06+5:30
‘आयरिस जयपूर’ने मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, विविध लक्झरी हॉटेल्सने चांदीची भांडी पुरवठा करण्यास सांगितले आहे.

पाहुणे जेवणार सोन्या-चांदीच्या ताटात; २०० कारागिरांनी बनवली १५,००० चांदीची भांडी
नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहणारे राष्ट्रप्रमुख आणि इतर जागतिक नेत्यांना भारताच्या सांस्कृतिक वारशाने प्रेरित कलाकृती असलेल्या सोन्या-चांदीच्या विशेष भांड्यांमध्ये जेवण दिले जाईल. जयपूरस्थित मेटलवेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने ही माहिती दिली.
‘आयरिस जयपूर’ने मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, विविध लक्झरी हॉटेल्सने चांदीची भांडी पुरवठा करण्यास सांगितले आहे. विदेशी पाहुण्यांच्या डिनर आणि लंचसाठी या भांड्यांचा वापर केला जाणार आहे. चांदीच्या भांड्यांच्या कंपनीचे लक्ष पाबुवाल यांनी सांगितले की, बहुतेक भांड्यांमध्ये स्टील किंवा पितळेचा वापर केलेला असतो किंवा दोन्हींचे मिश्रण चांदीच्या लेपसह असते, तर काही भांडी जसे की प्लेटवर सोन्याचा मुलामा असतो. ते म्हणाले की, २०० कारागिरांनी जी-२० शिखर परिषदेसाठी सुमारे १५,००० चांदीची भांडी बनवली आहेत.
अध्यक्ष बायडेन नेमके काय करणार?
विकसनशील देशांसाठी काम करणे, हवामान, तंत्रज्ञान या मुद्यांसह बहुराष्ट्रीय विकास बँकांना आकार देणे यासारख्या विषयांवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे शिखर परिषदेत लक्ष केंद्रित करणार आहेत, असे व्हाइट व्हाउसने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा गट या विषयांवर प्रगती करू शकेल, अशी आशा व्हाइट हाउसने व्यक्त केली.
‘माझी पाळेमुळे भारतीय असल्याचा अभिमान’
माझी पाळेमुळे भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असे मत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी व्यक्त केले. सुनक यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. भारताशी असलेल्या माझ्या संबंधाचा मला खूप अभिमान आहे. माझी पत्नी भारतीय आहे आणि एक हिंदू असल्याचा अर्थ आहे की, भारत आणि भारतासोबतच्या लोकांशी माझा नेहमीच स्नेह राहील.