अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:29 IST2025-09-16T11:48:53+5:302025-09-16T12:29:26+5:30
Odisha News: मृत्यू झालेल्या एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली. तिची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत तिचा मृतदेह चितेवर ठेवला. त्यानंतर मुखाग्नी देऊन चिता पेटवणार तोच अचानक मृतदेहाची हालचाल झाली.

अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच मृत व्यक्ती जिवंत झाल्याच्या घटना घडल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आता अशीच एक घटना ओदिशामधील पुरी येथे घडली आहे. येथे मृत्यू झालेल्या एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली. तिची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत तिचा मृतदेह चितेवर ठेवला. त्यानंतर मुखाग्नी देऊन चिता पेटवणार तोच अचानक मृतदेहाची हालचाल झाली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ओदिशामधील गंजम जिल्ह्यातील पोलसारा येथील रहिवासी असलेली पी. लक्ष्मी ही ८६ वर्षीय महिला आजारी होती. तसेच स्थानिक रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर सोमवारी तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पुरी येथील स्वर्गद्वार स्मशानभूमीत नेण्यात आलं तेव्हा मृतदेहाला मुखाग्नी देण्यापूर्वी तिच्या देहामध्ये हालचाल दिसून आली.
या महिलेचा मृतदेह चितेवर ठेवून नातेवाईक आणि पुजारी जेव्हा अंत्यसंस्काराची तयारी करत होते. त्याचवेळी मृतदेहामध्ये हाचलाच झाली. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले लोक अवाक् झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, महिलेचा श्वास सुरू होता. त्यानंतर अंत्यसंस्कार त्वरित रोखण्यात आले. तसेच लक्ष्मी नावाच्या या महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी ती जिवंत असल्याचे सांगत तातडीने उपचार सुरू केले.