मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 08:48 IST2023-09-17T08:48:03+5:302023-09-17T08:48:41+5:30
‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती.

मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली ‘इंडिया’ची पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द, कारण..
नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडी समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत मोठा गाजावाजा करून घोषणा केलेली भोपाळमधील पहिली संयुक्त जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काढण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या ११ हजार ४०० किमी अंतराच्या राज्यव्यापी जनआक्रोश यात्रेमुळे ही रॅली रद्द करण्यात आल्याचे कारण देण्यात येत आहे. प्रत्यक्षात सनातन धर्मावर टीका करणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना भोपाळचे व्यासपीठ लाभू नये म्हणून राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी ही रॅली रद्द करण्यास भाग पाडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘इंडिया’ आघाडीतर्फे देशव्यापी संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावला जाईल आणि त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळपासून होईल, अशी घोषणा दिल्लीत १३ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’च्या समन्वय समितीने केली होती. द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीचे तीव्र पडसाद हिंदी भाषिक राज्यांमध्ये उमटत आहेत. सनातनच्या मुद्यावर वाद-चर्चा बंद करावी, असे समन्वय समितीच्या बैठकीत सप, राजद आणि जदयुच्या नेत्यांनीही द्रमुकला बजावले होते.
मध्य प्रदेशात तयारीला फटका बसू नये, म्हणून...
या मुद्यावरून मध्य प्रदेशात काँग्रेसच्या तयारीला फटका बसू नये म्हणून पहिली संयुक्त जाहीर सभाच रद्द करण्यास राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठी तसेच ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीला भाग पाडले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे गोविंद सिंह, जितू पटवारी, अरुण यादव, कमलेश्वर पटेल, अजय सिंह आणि कांतीलाल भुरिया हे सात नेते ११ हजार ४०० किलोमीटरच्या ‘जनआक्रोश यात्रे’मध्ये गुंतणार असल्यामुळे भोपाळच्या जाहीर सभेची तयारी करणे शक्य होणार नसल्याची सबब राज्यातील नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिली आहे.