पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 05:33 IST2025-07-22T05:32:46+5:302025-07-22T05:33:10+5:30
पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ल्यासह इतर मुद्यांवर विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला.

पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ल्यासह इतर मुद्यांवर विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. नंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने दिवसभरासाठी हे कामकाज तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी पहलगाम हल्ल्याचा तसेच बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या सुरू असलेल्या पुनरावलोकनाचा मुद्दा उपस्थित करीत चर्चेची मागणी लावून धरली. यामुळे एकच गोंधळ उडाला. कामकाज सुरू झाल्यानंतर २० मिनिटांतच गोंधळामुळे दुपारी १२ पर्यंत ते तहकूब करण्यात आले. दुपारी ४ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. परंतु, लगेच विरोधक आक्रमक झाले आणि गोंधळ सुरू झाला.
पंतप्रधानांची मंत्र्यांसोबत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत मंत्रिमंडळातील सदस्यांसोबतच विविध मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीबाबत सरकार किंवा सत्ताधारी पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले गेले नाही. परंतु, संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासोबतच विरोधकांची आक्रमकता कशी कमी करायची यावर चर्चा झाली असल्याचे समजते. पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्याहून मायदेशी परतल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे.
हे अधिवेशन म्हणजे विजयोत्सव : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना नमूद केले की, ‘हे अधिवेशन म्हणजे एक विजयोत्सव आहे.’ ही भावना सर्व संसद सदस्य मांडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोदी यांनी सरकारच्या अनेक बाबींवर भाष्य केले. ‘बॉम्ब आणि बंदुकांवर संविधानाचा विजय होत आहे’, असे ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपले लक्ष्य शंभर टक्के गाठल्याचेही सांगून संपूर्ण जगाला यातून आपले सामर्थ्य दिसले, असे ते म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेसाठी सरकारची तयारी
लोकसभेत विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद देत सरकारने पहलगाम हल्ला व ‘ऑपरेशन सिंदूर’वर १६ तासांच्या चर्चेस तयारी दर्शवली. ही चर्चा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात विदेश दौऱ्यावर जात असून ते सभागृहात उपस्थित राहावयाचे असतील तर ही चर्चा पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे.