देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्याचे भरभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले, "भारताने पाकिस्तानात घुसून हल्ला केला. भारतविरोधी दहशतवाद्यांनी भारतमातेच्या मस्तकावर हल्ला करून अनेक कुटुंबांचे कुंकू (सिंदूर) पुसले, त्यांना भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमाने न्याय मिळवून दिला आहे. यासाठी आज संपूर्ण देश भारतीय सैन्याचे अभिनंदन करत आहे."
...तेव्हा सीमेपलीकडील जमीनही दहशतवाद्यांसाठी सुरक्षित राहत नाही -राजनाथ सिंह पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. हे ऑपरेशन दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे आणि त्याच्या लष्करी सामर्थ्याच्या क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन आहे. आम्ही दाखवून दिले आहे की, जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई करतो तेव्हा सीमेपलीकडील जमीनही दहशतवाद्यांसाठी आणि त्यांना पोसणाऱ्यांसाठी सुरक्षित राहत नाही.
पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचला भारतीय लष्कराचा दरारा -“पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने धैर्य आणि शौर्य तसेच संयम दाखवत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून योग्य प्रकारे प्रत्त्युत्तर दिले. आम्ही केवळ सीमेजवळील लष्करी तळांवर कारवाई केली नाही, तर पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत भारतीय लष्कराचा दरारा पोहोचला, असेही राजनाथ सिंह म्हणाले.