नवी दिल्ली - भारतातून अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित झालेले १०४ भारतीय पुन्हा मायदेशी परतलेत. अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या या भारतीयांना मॅक्सिको-अमेरिकेच्या सीमेवर पकडले होते. हे लोक भारतातून कायदेशीरपणे गेले परंतु डंकी रूटच्या माध्यमातून या लोकांनी अमेरिकेत घुसखोरी केली. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात मोहिम उघडली आहे. त्यातून ही कारवाई करण्यात आली.
आता अमेरिकेने त्यांच्या लष्करी विमानाने या १०४ भारतीयांना भारतात सोडले, यात अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त झालीत. हातात बेड्या घालून आलेल्या १०४ भारतीयांमध्ये प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी आहे. प्रत्येकजण त्यांचा अनुभव सांगत आहेत. यातील अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर नसल्याने काहींनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे. २० वर्षीय युवक आकाशची कहाणीही अशीच आहे. जो करनालच्या घरौडा गावचा रहिवासी होता. आकाशने देशाबाहेर जाण्याचं स्वप्न पाहिले होते. आकाशच्या हट्टापुढे घरचेही नरमले, त्यांनी कुटुंबातील जमिनीचा अडीच एकर तुकडा विकून आकाशला पाठवण्याची व्यवस्था केली.
६५ लाख एजेंटला दिले आणि ६-७ लाख वेगळा खर्च झाला
आकाशला अमेरिकेत पाठवण्यासाठी एजेंटला ६५ लाख देण्यात आले त्याशिवाय इतर खर्चासाठी ६-७ लाख देण्यात आले. आकाश १० महिन्यापूर्वी गेला होता. २६ जानेवारीला त्याने मॅक्सिको सीमेवरील भिंत ओलांडून अमेरिकेत पोहचला होता मात्र तिथे त्याला पकडण्यात आले. डंकी रूटचे २ मार्ग आहेत. एक थेट मॅक्सिको आणि दुसरा भिंत ओलांडून अमेरिकेत, मात्र तिथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक देशातून फ्लाईट, टॅक्सी, कॅटर, बस, जंगल, समुद्र पार करून जावे लागते. आकाशला मॅक्सिकोला पोहचवण्याचे पैसे एजेंटने घेतले परंतु त्याला दुसऱ्या मार्गाने पाठवले. आकाशनं त्याच्या भावाला अनेकदा कॉल करून व्हिडिओ दाखवले जे जंगलातील होते, याच रस्त्याने आकाशला पुढचा प्रवास करावा लागला.
भिंतीवरून उडी मारून अमेरिकेत पोहोचला आणि...
२६ जानेवारीला आकाशचं कुटुंबासोबत अखेरचं बोलणं झाले जेव्हा तो मॅक्सिकोमधील भिंतीवरून उडी मारून अमेरिकेत पोहचला होता, त्यावेळी त्याला सुरक्षा जवानांनी पकडले होते. त्यानंतर काही काळ त्याला रिमांडमध्ये घेऊन डिपोर्टच्या प्रक्रियेनुसार कागदपत्रावर सही करून घेतली. आकाश परत येतोय हे त्याचा भाऊ शुभमला बुधवारी कळाले. २६ जानेवारीनंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. अमेरिकेला जाण्यासाठी आकाशला ७२ लाखांचा खर्च आला होता. डिपोर्ट होऊन आकाश सकाळी त्याच्या भारतातील राहत्या घरी पोहचला. आता कुटुंबाने संबंधित एजेंटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे डंकी रूट?
डंकी रूट म्हणजे बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याचा मार्ग, त्यात लोक अनेक देशातून प्रवास करत बेकायदेशीरपणे अमेरिका, कॅनडा आणि युरोपात घुसखोरी करतात. हे लोक टूरिस्ट व्हिसा अथवा एजेंटच्या मदतीने अमेरिकेजवळील कुठल्या तरी देशात जसं ब्राझील, इक्वाडोर, पनामा अथवा मॅक्सिकोपर्यंत पोहचतात. तिथून जंगल, नदी, वाळवंट या मार्गाने पायपीट करत अमेरिका मॅक्सिकोच्या बॉर्डरवर पोहचतात. त्यानंतर एजेंटच्या मदतीने अमेरिकेत बेकायदेशीर घुसखोरी करतात.