MP BJP:मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा अद्याप शांत झालेला नाही, तेच आता राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला संबोधित करताना देवरा म्हणाले, "संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत." या विधानानंतर त्यांच्यावर भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.
जगदीश देवदा म्हणाले, "पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारले याचा मनात खूप राग होता. त्या दिवसापासून संपूर्ण देशात तणाव निर्माण झाला. जोपर्यंत याचा बदला घेतला जात नाही, तोपर्यंत आपण शांततेत श्वास घेऊ शकणार नाही, अशी भावना भारतीयांच्या मनात होती. मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो, त्यांच्या नेतृत्वात देशाने या घटनेचा बदला घेतला. संपूर्ण देश, देशाचे सैन्य, सैनिक त्यांच्या चरणी नतमस्तक आहेत," असे वक्तव्य देवडा यांनी केले.
राजीनाम्याची मागणीकाँग्रेसने या विधानाला लष्कराचा अपमान म्हटले आहे. पक्षाच्या वतीने 'X' वर लिहिले, "देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक, असे मध्य प्रदेशातील भाजप सरकारचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी म्हटले आहे. जगदीश देवदा यांचे हे विधान खूपच स्वस्त आणि लज्जास्पद आहे. हा सैन्याच्या शौर्याचा आणि धाडसाचा अपमान आहे. आज संपूर्ण देश सैन्यासमोर नतमस्तक होत आहे, तेव्हा भाजप नेते आपल्या शूर सैन्याबद्दल वाईट विचार व्यक्त करत आहेत. भाजप आणि जगदीश देवदा यांनी माफी मागावी. त्यांना पदावरून काढून टाकले पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.