४० दिवसांत ४० आमदार गेले हा हनुमान चालीसाचा प्रभाव, भाजप नेत्याचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:54 IST2022-06-30T18:54:14+5:302022-06-30T18:54:14+5:30
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

४० दिवसांत ४० आमदार गेले हा हनुमान चालीसाचा प्रभाव, भाजप नेत्याचं वक्तव्य
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश सरकारला दिले. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
“ज्यांचं सरकार पडतं, ज्यांच्या पक्षात फुट पडते, त्यांच्याशी नेतृत्व करणाऱ्यांना विचारायला हवं. कमलनाथ यांना विचारा त्यांचे ३२ आमदार कसे गेले. उद्धव ठाकरेंना विचारा. हा हनुमान चालीसाचा प्रभाव आहे. चाळीस दिवसांत चाळीस आमदार निघून गेले. संजय राऊत म्हणत होते आमच्या लोकांचं अपहरण केलं होतं असं ते म्हणत होते. ते भगवे झाले. देशात पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार पडलंय. माझा देश बदलतोय,” असं नरोत्तम मिश्रा म्हणाले.
ज्यांना मोठे केले तेच विसरले - उद्धव ठाकरे
सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी आलोच अनपेक्षितपणे. जातो पण तसाच आहे. मी पुन्हा येईन, म्हणालो नव्हतो, असे सांगतानाच उद्धव यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर आगपाखड केली. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तरी मला लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही, असं ते म्हणाले होते.