६ वर्षापासून एकांतात, ना फोन, ना सोशल मीडिया; राधा अन् जियाच्या आयुष्याचा शेवट असा का झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:21 IST2025-12-26T16:19:57+5:302025-12-26T16:21:06+5:30
या दोघी बहिणी सोशल मिडिया, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक सोहळ्यापासून दूर राहत होत्या. मागील ६ वर्षापासून त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या.

६ वर्षापासून एकांतात, ना फोन, ना सोशल मीडिया; राधा अन् जियाच्या आयुष्याचा शेवट असा का झाला?
लखनौ - पारा परिसरात सख्ख्या बहिणींनी पाळीव श्वानाच्या आजारपणातून मानसिक तणाव आल्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. २४ वर्षीय राधा आणि २२ वर्षीय जिया असं या मुलींचे नाव आहे. दोघीही पदवीधर होत्या. दीर्घ काळापासून या दोघीही तणावाखाली होत्या आणि इतरांपासून दूर राहायचा. कुटुंबातही मिसळत नव्हत्या. परिसरातील कुणाशीही संवाद साधत नव्हत्या असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
६५ वर्षीय कैलाश सिंह यांच्या २ मुलींनी जर्मन शेफर्ड प्रजातीचा पाळीव श्वान पाळला होता. ज्याचे नाव टोनी होते. टोनी मागील एक महिन्यापासून गंभीर आजारी होता. उपचारानंतरही त्याच्यात सुधारणा होत नव्हती. श्वान वाचणार नाही याची भीती बहिणींना होती. त्यातूनच त्या तणावात होत्या. छोटी बहीण जिया सिंहची मानसिक स्थिती आधीपासून ठीक नव्हती. श्वानाच्या आजारपणामुळे जियासोबत राधाही मानसिक तणावत आली. त्यातूनच या दोघींनी फिनाईल प्यायले. आई वडिलांना ही बाब कळताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघींना राणी लक्ष्मी बाई हॉस्पिटलला दाखल केले, मात्र वाटेतच राधाचा मृत्यू झाला तर जियाने उपचारावेळी प्राण सोडले.
या दोघी बहिणी सोशल मिडिया, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक सोहळ्यापासून दूर राहत होत्या. मागील ६ वर्षापासून त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या. मोबाईल आणि सोशल मिडिया यातही त्या रमल्या नाहीत. बहुतांश वेळ त्या दोघी त्यांच्या पाळीव श्वानासोबत राहायच्या. या दोघी कधी फोटोही काढत नव्हत्या. फोटो काढा म्हटल्यावर त्यांना राग यायचा. दोघीही एकमेकांशिवाय राहत नव्हत्या. त्या कुटुंबात राहूनही वेगळ्या होत्या. त्यांच्या जेवणात श्वानाचाही वाटा ठेवायच्या. अन्य कुणी जेवण मागितले तर त्याला नकार द्यायच्या. या दोघींच्या अशा वागणुकीवर अनेकांनी विविध तर्क लढवले होते.
दरम्यान, या दोघींवर कुणाची वाईट सावली आहे का असाही त्यांच्या कुटुंबाला संशय होता. बऱ्याचदा दोघींनी बालाजीला नेले होते. परंतु तिथून परतल्यानंतरही त्यांच्या वागणुकीत फार बदल होत नसे. या दोघी टोनी श्वानाला खूप प्रेम करत होत्या. जर श्वानाने काही खाल्ले नाही तर दोघीही जेवत नव्हत्या. श्वान आजारी पडल्यापासून या दोघी मानसिक तणावात गेल्या. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.