हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:27 IST2025-10-18T13:26:21+5:302025-10-18T13:27:09+5:30
कुटुंबासोबत मध्य प्रदेशातील इंदूरला गेलेल्या जयपूरच्या एका व्यक्तीला इंदूरमधील एका हॉटेलमध्ये अत्यंत वाईट अनुभव आला.

हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला?
कुटुंबासोबत मध्य प्रदेशातील इंदूरला गेलेल्या जयपूरच्या एका व्यक्तीला इंदूरमधील एका हॉटेलमध्ये अत्यंत वाईट अनुभव आला. त्यांनी घेतलेल्या रूममधील अंथरुणामध्ये असलेल्या ढेकणांमुळे त्यांना रात्रभर प्रचंड त्रास सहन करावा लागला. सकाळी उठल्यावर दोघांच्याही शरीरावर पुरळ उठले होते आणि खाज सुटली होती. ग्राहकांच्या तक्रारीनंतर सेवा दोष आणि निष्काळजीपणा ठरवत जयपूर ग्राहक आयोगाने हॉटेलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रात्रभर ढेकणांचा त्रास
जयपूरच्या ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले अशोक सोनी हे २२ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या मुलीसह इंदूरला गेले होते. तिथे त्यांनी इंदूरच्या न्यू सुंदर हॉटेलमध्ये मुक्काम करण्यासाठी एक खोली घेतली. रात्री ते अंथरुणावर झोपायला गेले, तेव्हा त्यांना काहीतरी चावत असल्याची जाणीव झाली. रात्रभर बाप-लेक अस्वस्थ झाले होते, पण त्यांना नेमके कशाचा त्रास होत आहे हे लक्षात आले नाही.
अंगावर पुरळ अन् पलंगावर ढेकूण
२३ जानेवारीच्या सकाळी दोघे उठले तेव्हा त्यांना शरीरावर प्रचंड खाज सुटली होती. त्यांनी पाहिल्यावर दोघांच्याही शरीरावर लाल रंगाचे पुरळ उठले होते. त्यांनी खोलीतील दिवा लावून पलंग तपासला, तेव्हा त्यांना पलंगावर मोठ्या प्रमाणात ढेकूण दिसले. त्वरित अशोक सोनी यांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पुरावा जमा केला.
हॉटेल मालकाचा तक्रार करण्यास नकार
त्यानंतर अशोक सोनी यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे याबद्दल तक्रार केली. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्याकडे उत्तम साफसफाई होत असल्याचा दावा करत हॉटेलमध्ये ढेकूण नसल्याचे सांगत तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, सोनी यांनी रेकॉर्ड केलेला ढेकणांचा व्हिडीओ दाखवताच हॉटेल व्यवस्थापनाची बोलती बंद झाली.
ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय
या घटनेनंतर अशोक सोनी यांनी जयपूरमधील जिल्हा ग्राहक आयोग, जयपूरमध्ये हॉटेलविरोधात तक्रार दाखल केली. आयोगाने हा प्रकार सेवा दोष आणि घोर निष्काळजीपणा असल्याचे मानले. अखेरीस, आयोगाने न्यू सुंदर हॉटेलला एक लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला. हॉटेलला आता ग्राहकाला ही नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.