काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले होते. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपांबाबत शपथपत्र द्या, अन्यथा माफी मागा, असे आदेश राहुल गांधी यांना दिले आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोग आणि विरोधकांमधील वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचाली विरोधकांनी सुरू केल्या आहेत.
काँग्रेसचे खासदार सय्यद नासिर हुसेन यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी पक्षामध्ये सध्यातरी कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र गरज भासल्यास नियमांनुसार काँग्रेसच महाभिगोय प्रस्ताव आणू शकते, असा दावा हुसेन यांनी केला.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगावर करण्यात येत असलेले मतचोरीचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच अशा खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही आणि मतदारही घाबरत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. घटनेकडून मिळालेल्या अधिकाऱाचा वापर करत कुठल्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले. तसेच सर्व राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगच करतो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नजरेत कुणीही पक्ष नाही आणि कुणीही विरोधी पक्ष नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.