उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. ढिगाऱ्याखाली आठ जण अडकले असून, प्रशासनाने म्हटले आहे की, ज्या ठिकाणी घटना घडल्या आहेत, तिथे युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने सांगितले की, रात्री झाले पावसामुळे जिल्ह्यातील बसुकेदार परिसरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालजामणमध्ये ४ ते ५ इमारतींचा काही भाग कोसळला आहे. या इमारतींमध्ये असणाऱ्या कुटुंबांना जवळच्या शाळेत हलवण्यात आले आहे.
छेनागढमध्येही आठ लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. एसडीआरएफ, डीडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाची पथके सध्या शोध घेत आहेत. जखोलीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.
चमोली जिल्ह्यातही इमारत कोसळली
देवाल विकासखंडमध्ये गुरुवारी रात्री भूस्खलन होऊन नागरिक राहत असलेल्या इमारतीचे नुकसान झाले.
उपजिल्हाधिकारी पंकज कुमार भट्ट म्हणाले, "इथे दोन लोक बेपत्ता आहेत. दोन जखमी आहेत. १५ ते २० गुरे ढिगाऱ्याखाली दबली गेल्याची शंका आहे."
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले, "राज्यातील वेगवेगळ्या घटनांसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेतली आहे. रुद्रप्रयागमधील बसुकेदार तालुक्यात बुडेथ डुंगर टोक, चमोली जिल्ह्यातील देवाल परिसरात आणि नैनीताल, बागेश्वर, टिहरीमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे."