गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:03 IST2025-08-02T18:01:08+5:302025-08-02T18:03:08+5:30

दिल्लीत गटारात पडलेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

The child who was rescued from the sewer in Delhi was playing outside Home | गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का

गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का

Delhi Accident: दिल्लीत दोन दिवसांपूर्वी एक सात वर्षांचा मुलगा उघड्या गटारात पडल्यामुळे खळबळ उडाली होती. दिल्ली पोलिसांना वसंत कुंज परिसरात उघड्या गटारात एक मुलगा पडल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल आला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक मुलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मुलाला गटारात घसरताना पाहिले होते. माहिती मिळताच शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. गटारातील कचरा काढण्यासाठी जेसीबी मशीन मागवण्यात आली जेणेकरून बचाव कार्य सोपे होईल. अग्निशमन दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्यानंतरही मुलगा सापडला नाही. मात्र त्यानंतर तो मुलगा त्याच्या घरी सुखरुप असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज येथे एक सात वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. शोधकार्याला २४ तास उलटले तरी मुलगा सापडला नाही. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. फुटेजमध्ये तो मुलगा गटाराच्या आसपास दिसत होता. मात्र त्यानंतर तो गायब झाला. शेवटी पोलिसांनी कसेबसे त्या मुलाचे घर शोधून काढलं. पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. तो मुलगा चक्क घरी खेळताना पोलिसांना आढळला.

गुरुवारी दुपारी पोलिसांना राजोकरीजवळ एक मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांना त्याला शेवटचे जवळच्या शाळेतील मुलांनी शॉर्ट्स घातलेले आणि त्याच्या मित्रासोबत रस्ता ओलांडताना पाहिल्याचे सांगण्यात आलं होतं. शाळेतील मुलांनी पोलिसांना सांगितले की तो पावसात खेळताना गटारात पडला होता आणि तेव्हापासून तो दिसला नाही. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलीस, एनडीआरएफ आणि एमसीडी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पहाटेपर्यंत मुलाचा शोध घेतला. बचाव कार्यादरम्यान, पोलिसांनी परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि फुटेजमध्ये एक मुलगा गटाराकडे जाताना दिसला. थोड्या वेळाने, पोलिसांना घटनास्थळापासून थोड्या अंतरावर दुसरा सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आढळला. या फुटेजमध्ये, मुलगा गटारापासून दूर जाताना दिसत होता.

पहिल्या आणि दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० मिनिटांचा फरक होता. एका फुटेजमध्ये मुलगा गटाराकडे जाताना दिसला आणि दुसऱ्या फुटेजमध्ये मुलाला गटारातून दूर जाताना पाहिले गेले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नसल्याने, पोलिसांना तो गटारात पडून बाहेर पडल्याचे कोणतेही फुटेज सापडले नाही. मुलाला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि पोलीस स्टेशन्सवर हे फुटेज पाठवले. हा व्हिडिओ मुलाच्या शिक्षकापर्यंत पोहोचला आणि त्यांनी मुलाला ओळखले. शिक्षकाने पोलिसांना सांगितले की तो मुलगा तिसरीच्या वर्गात शिकत होता आणि राजोकरी गावातील आहे. पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि सगळा प्रकार समोर आला.
 
दरम्यान, तो मुलगा जिथे गटारात पडला आणि तिथून सुमारे २० मीटर अंतरावर गटाराचा एक भाग उघडा होता. ज्यातून तो बाहेर आला. त्यानंतर तो पायी घरी परतला मुलाने पोलिसांना सांगितले की तो आणि त्याचा मित्र पावसात खेळत होते. तिथे पावसाचे पाणी भरले होते. त्यामुळे त्याला गटाराचे तोंड दिसत नव्हते आणि तो चुकून त्यात पडला.

Web Title: The child who was rescued from the sewer in Delhi was playing outside Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.