बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:47 IST2025-07-31T14:47:02+5:302025-07-31T14:47:45+5:30

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांना निर्दोष मुक्त करत असल्याचे न्यायलयाने म्हटले.

The chassis number of the bike was not found! How did Pragya Singh Thakur escape from the Malegaon bomb blast case? | बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?

बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?

महाराष्ट्राच्या मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय सुनावला असून, या प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आरोपींविरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांना निर्दोष मुक्त करत असल्याचे न्यायलयाने म्हटले. या प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकूर या मुख्य आरोपी होत्या.   

न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर भावुक झाल्या. न्यायालयाच्या निर्णयावर त्या म्हणाल्या की, "हा माझा विजय नाही तर भगव्याचा विजय आहे. मला १७ वर्षे अपमानित करण्यात आले. एका संन्याशाला दहशतवादी बनवण्यात आले. हा हिंदुत्वाचा विजय आहे. माझे जीवन आता अर्थपूर्ण झाले आहे."

प्रज्ञा यांच्याविरुद्ध काय पुरावे होते?
प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध एनआयएने न्यायालयाला सांगितले की, मशिदीबाहेर ज्या बाईकमध्ये स्फोट झाला ती तिच्या नावावर होती. एनआयएने म्हटले आहे की, या बाईकवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. त्यासोबतच चेसिस नंबर आणि इंजिन नंबरही खोडून काढण्यात आला होता. एनआयएने या गाडीला प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्धचा सर्वात मोठा पुरावा म्हटले होते. त्यामुळेच प्रज्ञा यांना संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले.

एनआयए वाहनाची ओळखही सिद्ध करू शकले नाही!
या संपूर्ण प्रकरणाबाबत, एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, सरकारी वकिलांनी बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्ध केले. तथापि, ते हे सिद्ध करू शकले नाहीत की बॉम्ब गाडीतच ठेवला होता. यासोबतच न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी आपल्या निकालात म्हटले आहे की, बाईकचा चेसिस नंबरही सापडला नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर त्या बाईकच्या मालक होत्या हे सिद्ध होऊ शकले नाही.

प्रज्ञा ठाकूर यांना निर्दोष सोडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे बाईकचा चेसिस क्रमांक ना सापडणं. न्यायालयाने म्हटले की, केवळ बोलण्याने काही होत नाही, एखाद्याला दोषी सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे देखील असले पाहिजेत. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी त्यांना बाईकमध्ये ठेवलेल्या बॉम्बबद्दल सांगितले होते असे म्हटले होते, मात्र हे देखील सिद्ध होऊ शकले नाही.

'या' लोकांना आरोपी बनवण्यात आले
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिलकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकरधर द्विवेदी यांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे.

Web Title: The chassis number of the bike was not found! How did Pragya Singh Thakur escape from the Malegaon bomb blast case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.