'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:46 IST2025-09-20T14:45:24+5:302025-09-20T14:46:06+5:30
"आत्मनिर्भर भारतच देशाच्या शक्ती, सन्मान आणि स्थैर्याचा आधार बनेल..."

'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (20 सप्टेंबर) गुजरातमधील भावनगर येथे आयोजित 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमावेळी देशभरातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांसाठी एकूण 34,200 कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च येणार येणे अपेक्षित आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "भारताचा सर्वात मोठा शत्रू कुठलाही देश नाही, तर परदेशांवरील आपले 'परावलंबन' आहे. हे संपवून 'आत्मनिर्भर भारता'चा संकल्प पूर्ण करायचा आहे."
गुजरातसाठी 26,354 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन -
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 26354 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यांत, छारा बंदरावर एचपीएलएनजी री-गॅसिफिकेशन टर्मिनल, गुजरात आयओसीएल रिफायनरीमध्ये ॲक्रिलिक्स अँड ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प, 600 मेगावॉटचे ग्रीन शू इनिशिएटिव्ह, पीएम-कुसुम योजनेअंतर्गत 475 मेगावॉट सोलर फीडर, 45 मेगावॉटचा बादेली सोलर प्रकल्प, कच्छमधील धोर्डो हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव बनणे, भावनगर आणि जामनगर येथील सरकारी रुग्णालयांचा विस्तार, 70 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे चार-पदरीकरण आदी कामांचा समावेश आहे.
काय म्हणाले मोदी? -
भावनगर येथील विशाल जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारत विश्वबंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे. आपल्यासाठी कोणीही मोठा शत्रू नाही, पण जर कोणी सर्वात मोठा शत्रू असेलच तर तो म्हणजे, आपले दुसऱ्यांवर असलेले अवलंबित्व. हा भारताचा सर्वात मोठा कमकुवतपणा असून आपल्याला त्याला पराभूत करायचे आहे. 140 कोटी देशवासियांचे भविष्य आत्मनिर्भर भारतातच सुरक्षित आहे. जर आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो, तर आपला स्वाभिमान आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य दोन्ही धोक्यात येईल." एवढेच नाही तर, आत्मनिर्भर भारतच देशाच्या शक्ती, सन्मान आणि स्थैर्याचा आधार बनेल, असेही मोदी म्हणाले.