१४४ वर्षांनी योग अन् झोपेत गेले जीव; कुंभमेळ्यात जागोजागी चपला अन् कपड्यांचा खच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 08:22 IST2025-01-30T08:21:44+5:302025-01-30T08:22:04+5:30
४.२४ कोटी भाविकांनी बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गंगा आणि संगमामध्ये स्नान केले. तसंच १९.९४ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात आतापर्यंत स्नान केले असल्याचे सांगण्यात आले.

१४४ वर्षांनी योग अन् झोपेत गेले जीव; कुंभमेळ्यात जागोजागी चपला अन् कपड्यांचा खच
महाकुंभनगर : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात मंगळवारी उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीसाठी १४४ वर्षांनी आलेला योग महत्त्वाचे कारण ठरला आहे. सरकारसोबतच साधू-संतांनीही या शुभ योगाचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे लाखो भाविक संगमावर स्नानासाठी तासन् तास बसून किंवा झोपून होते. त्याचवेळी बॅरिकेड्स तोडून आत घुसलेल्या अनियंत्रित गर्दीने त्यांना चिरडले.
प्रत्यक्षदर्शींनी अंगावर काटा आणणारी ही स्थिती कथन केली. आसामहून आलेल्या मधुमिता यांनी सांगितले की, संगम घाटावर लोक सकाळ होण्याची वाट पाहत बसले होते आणि काही जण झोपले होते. त्याच वेळी, आखाड्यांच्या अमृतस्नानासाठी असलेले बॅरिकेड्स तोडत अनियंत्रित गर्दी घाटाच्या दिशेने धावली. घाटावर झोपलेले लोक त्या गर्दीच्या तावडीत सापडले आणि त्यांचा चेंगराचेंगरीत बळी गेला.
अचानक गर्दीचा लोट...
झारखंडच्या राम सुमिरन यांनी या घटनेबाबत सांगितले, की १४४ वर्षांनंतर आलेल्या या पुण्यस्नानाच्या संधीला कोणीही गमावू इच्छित नव्हते. म्हणूनच देशभरातून आलेले लाखो श्रद्धाळू संगम तटावर मोकळ्या आकाशाखाली बसले होते, पण अचानक गर्दीचा लोट आला
आणि झोपलेले भाविक त्याखाली चिरडले गेले.
‘गंगामातेच्या इच्छेनेच हे झाले असावे’
बिहारमधील बेगूसराय येथील बदामा देवी या वृद्ध महिलेने दु:ख व्यक्त करीत म्हटले, “बाळा, या जन्मात असा योग पुन्हा मिळेल की नाही, माहीत नाही. म्हणूनच इतक्या लांबून गंगामातेच्या दर्शनासाठी आलो. पण, हे माहीत नव्हते की इतकी मोठी दुर्घटना होईल. गंगामातेच्या इच्छेनेच हे झाले असावे.
जागोजागी चपला अन् कपड्यांचा खच
घटनेनंतर जागोजागी पडलेल्या चपला आणि विखुरलेले कपडेच ही दुर्घटना किती भयानक होती, याचे साक्षीदार आहेत. अनेक महिला आणि पुरुष यात जखमी झाले. आखाड्यांतील नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक संगमावर थांबले होते. ज्यांना गंगेच्या किनारी मोक्ष प्राप्त झाला ते भाग्यवान ठरले असे मला वाटते, असे सुमिरन म्हणाले.
घटनेनंतरही भक्तांचा ओघ कायम
मोबाइलवर चेंगराचेंगरीची घटना कळूनही कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या उत्साहात कोणतीही घट दिसली नाही. देशभरातील भाविक सतत मेळ्यात येत आहेत.